जालना : डोळ्यात दाटलेले अश्रू, ऊर भरून आलेला, दाटलेला कंठ अन् आपल्या आवडत्या वर्गशिक्षकाला बदली होण्यापासून रोखण्याची जिद्द ही गोष्ट आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बाबुळगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींची. शाळेतील विद्यार्थी प्रिय वर्गशिक्षक व मुख्याध्यापक जे. वाय. कुलकर्णी यांची बदली रोखण्यासाठी विद्यार्थिनींनी थेट जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य सीईओ वर्षा मिना यांना गाठून साकड घातले. एवढ्यावरच न थांबता जर सीईओने उचित कारवाई केली नाही तर प्रसंगी आंदोलन करण्याचाही इशारा या विद्यार्थिनींनी दिला आहे. 'कुलकर्णी सर यांच्यामुळे शाळा हेच आमचं आयुष्य झाले आहे, सरांची बदली झाली तर आमचं आयुष्य उध्वस्त होईल' अशी उद्विग्न प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
advertisement
जिल्हा परिषद शाळा त्यात शिकवणारे शिक्षक पण शाळेत मिळणाऱ्या शिक्षणाच्या दर्जा विषयी मागील काही वर्षांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. खाजगी शाळांचे पेव फुटलेले असताना जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा घसरल्याची अनेक उदाहरणे देखील पाहायला मिळतात. त्यामुळे शाळांचे खाजगीकरण रोखण्याची मागणी देखील जोर धरू लागल्याचे आपण पाहतोय. मात्र जर शिक्षक योग्य पद्धतीने शिकवत असतील तर अशा शिक्षकांना आपल्याच शाळेवर शिकवण्यासाठी विद्यार्थी किती आग्रह धरू शकतात पण काय करू शकतात हे बाबुळगाव येथील विद्यार्थिनींनी दाखवून दिले.
दरम्यान बाबुळगाव येथील शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या जे. वाय. कुलकर्णी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाबरोबरच आयुष्याची शाळा देखील चांगल्या पद्धतीने शिकवली. त्यामुळेच विद्यार्थ्यांना शाळा न वाटता त्यांचे आयुष्य वाटू लागले. यातूनच भावना विभोर झालेल्या विद्यार्थिनी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक जे. वाय. कुलकर्णी यांची बदली रोखण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी दर्शवित आहेत.
'आमच्या वर्गात 17 मुली आणि 9 मुले आहोत. जे.वाय. कुलकर्णी सर यांची बदली रोखण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. त्यासाठी आमच्याकडून जेवढे प्रयत्न होतील तेवढे आम्ही करू. जेव्हापासून कुलकर्णी सर शाळेचे मुख्याध्यापक झाले तेव्हापासून शाळा हेच आमचे आयुष्य झाले. जर ते सर चालले गेले तर मग आमचे आयुष्य संपले. दुसरे शिक्षक कसे येतील हे आम्हाला माहीत नाही. पण आम्हाला कुलकर्णी सरच हवेत', अशी प्रतिक्रिया शाळेची आठवी वर्गात शिकणारी विद्यार्थिनी शिवानी मनोज गायकवाड हिने व्यक्त केली.





