जालना : मागील 36 तासांपासून संपूर्ण मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नद्या, नाल्यांना पूर आला आहे. मराठवाड्यातील अनेक प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी 11:30 वाजता निम्न दुधना प्रकल्पाचे चार दरवाजे 0.50 मीटरने उघडण्यात येणार असून यातून 6528 क्युसेकने दुधना पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे दुधना पात्र परिसरातील गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन निम्न दुधना प्रकल्प, पुर नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.
advertisement
जालना जिल्ह्यात परतुर आणि मंठा तालुक्यामध्ये पावसाचा जोर हा अधिक असून अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. यामुळे परतुर तालुक्यातील केसुरा नदीला पूर आला आहे. तसेच परतुर ते आष्टी दरम्यानचा संपर्कही तुटल्याचे पाहायला मिळाले आहे. यासोबतच मंठा शहरांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे.
रस्त्यावरून 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी वाहत असल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचे देखील चित्र पाहायला मिळाले. जालना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मागील 36 तासांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. तसेच सोयाबीन, कापूस, मोसंबी इत्यादी पिकांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
सोलापुरात लाल मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींची क्रेझ, किंमतीही लक्षवेधी, काय आहे यात स्पेशल?
जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयातील पाण्याचे प्रमाणही वाढले आहे. घाणेवाडी जलाशय तुडुंब भरले आहे. तसेच येत्या काही काळामध्ये जोरदार पाऊस झाल्यास घाणेवाडी तलाव ओसंडून वाहू लागेल. याच घाणेवाडी तलावातून नवीन जालना शहराला पाणीपुरवठा केला जातो. यामुळे घाणेवाडी तलाव तुडुंब भरणे जालना शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
जिल्ह्यातील सर्वच मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये पाणी वाढत आहे. या पावसामुळे भविष्यातील पाण्याची तहान भागणार आहे. यामुळे जालना जिल्ह्यातील नागरिकांमध्ये या पावसामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.