चौकशीसाठी बजावले समन्स...
जयकुमार गोरे यांची बदनामी करून खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात वडूज पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी पत्रकार तुषार खरात आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे. आता, या तपासाच्या प्रकरणात आता रामराजे निंबाळकर यांची चौकशी करण्यात येणार आहे. शनिवारी, 3 मे रोजी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची सूचना निंबाळकर यांना देण्यात आली आहे.
advertisement
जयकुमार गोरे यांनी काय म्हटले होते?
या प्रकरणात राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर बदनामी करणारे मजकूर प्रसारित झाल्याचा आरोप आहे. ऑनलाइन न्यूज पोर्टल तुषार खरात यांना अटक करण्यात आली आहे. खरात यांनी न्यूज पोर्टलच्या माध्यमातून आपल्या बदनामीचे अनेक व्हिडीओ प्रसारीत केल्याचा आरोप मंत्री जयकुमार गोरे यांनी केला होता. त्याशिवाय, ज्या महिलेने आरोप केल्याचा दावा केलाय जातोय, त्या महिलेशी संबंधित प्रकरण कोर्टाने आधीच निकाली काढण्यत आले असल्याचे गोरे यांनी सांगितले आहे. या प्रकरणी विधानसभेत हक्कभंगही दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. खरात यांच्याविरोधात खंडणीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. गोरे यांच्या बदनामीच्या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाशी संबंधित काही नेते गुंतले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि तुषार खरात यांच्यात फोनवरून चर्चा झाली असल्याचे सांगितले होते.
रामराजेंना चौकशीसाठी बोलावणं, राजकारण तापणार?
रामराजे निंबाळकर यांना समन्स पाठवला गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. रामराजे हे सातारा जिल्ह्यातील अत्यंत प्रभावशाली नेते मानले जातात. त्यांच्या राजकीय भूमिकेला जिल्ह्यात महत्त्व आहे आणि त्यामुळेच पोलिसांकडून त्यांना समन्स बजावण्यात आल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पुढील तपास काय निष्पन्न होईल आणि रामराजेंची भूमिका काय असते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी राजकीय घडामोडींवर याचा थेट परिणाम होऊ शकतो.