शिंदे गटाकडून 'ऑपरेशन टायगर'
कल्याण-डोंबिवली पालिकेचे निकाल जाहीर होऊन २४ तास उलटत नाहीत, तोच ठाकरे गटाला खिंडार पाडण्यास सुरुवात झाली. ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक मधुर म्हात्रे आणि अॅड. कीर्ती ढोणे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. यामुळे ठाकरे गटात मोठी अस्वस्थता पसरली असून, महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपनेही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
कल्याण पूर्वेतील ठाकरे गटाचे नगरसेवक नितीन खंबायत यांनी आपल्या मित्रपरिवाराने दिलेल्या देणगीतून ही निवडणूक लढवली होती आणि जिंकली देखील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खंबायत यांना आपल्या गटात खेचण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांनी पैशांची मोठी ऑफर दिली. त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, पक्षाशी प्रतारणा करण्यापेक्षा त्यांनी एकांत निवडणं पसंत केलं.
"ठाकरे गटाचे ९ नगरसेवक सुरक्षित"
या सर्व प्रकारावर ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा जिल्हा संघटक अभिजीत सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते म्हणाले, "आमचे नगरसेवक नवखे असल्याचा गैरफायदा शिंदे गट घेत आहे. त्यांना चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करून द्विधा मनस्थितीत टाकले जात आहे. मात्र, आमचे ११ पैकी ९ नगरसेवक सुरक्षित असून ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पूर्णपणे एकनिष्ठ आहेत."
शिंदे गटाचे स्वतःचे मातब्बर उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाले असताना, दुसऱ्यांचे उमेदवार फोडण्यावर शक्ती खर्च केली जात असल्याने मित्रपक्षातूनही टीका होत आहे. "स्वतःच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ताकद लावायची सोडून इतरांचे उमेदवार फोडण्याचा अधिकार शिंदे गटाला कोणी दिला?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
