कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठा वाद उफाळून आला आहे. भाजप कार्यालयाचे दार बंद करून अरुण गीध यांच्या गळ्यात भाजपचा पट्टा टाकल्याचा गंभीर आरोप त्यांची बहिणी माजी नगरसेविका वंदना गीध यांनी केला आहे. एकीकडे महायुतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापल्याचं चित्र दिसत आहे.
advertisement
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीची घोषणा होताच सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात युती कशी करायची यावर चर्चा सुरू आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक अरुण गीध आणि त्यांची बहीण माजी नगरसेविका वंदना गीध यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशानंतर मात्र शिवसेना-भाजपमध्ये जोरदार जुंपल्याचे दिसून आले.
भाजप-शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या...
भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आरोप केला की, महायुतीमध्ये एकमेकांचे पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षात घेऊ नयेत असा अलिखित करार आहे. तरीही भाजपचे सदस्य असलेल्या नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश देऊन युती धर्म मोडण्यात आला असून भाजपच्या पाठीमागे खंजीर खुपसण्याचं काम झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.या आरोपांना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “युतीचे निर्णय नरेंद्र पवार घेत नाहीत. रवींद्र चव्हाण, देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, निवडणूक अधिकारी नाना सूर्यवंशी आणि भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब हे निर्णय घेतात. नरेंद्र पवारांना या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही,” असा पलटवार मोरे यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेला प्रवेश हा अधिकृत असून त्यावर शंका घेणे म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी केलेले वक्तव्य असल्याचंही त्यांनी सांगितलं.
भाजप कार्यालयाचे दरवाजे बंद केले अन्...
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अरुण गीध, वंदना गीध आणि त्यांचा भाऊ किरण गीध यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “आमच्या कार्यालयाशेजारी भाजपचे कार्यालय आहे. मित्रत्वाच्या नात्याने आम्ही तिथे ये-जा करत होतो. मात्र अचानक कार्यालयाचे दरवाजे बंद करून अरुण गीध यांच्या गळ्यात भाजपचा पट्टा टाकण्यात आला आणि फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. हे चुकीचं असून आमची फसवणूक झाली आहे, असा आरोप वंदना गीध यांनी केला. गीध कुटुंबाने स्पष्ट केलं की,आम्ही भाजपमध्ये कधीच प्रवेश केला नाही. आमचा अधिकृत प्रवेश एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विकासकामांसाठी निधी मिळावा, पाणीपुरवठ्यासारख्या प्रश्नांसाठी मदत व्हावी म्हणून आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे. तिकीट देण्याची कबुलीही देण्यात आली असून आम्ही त्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. महायुतीचे वरिष्ठ नेते युतीचे संकेत देत असले तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमधील हा वाद आता चव्हाट्यावर आला असून येत्या निवडणुकीत या वादाचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
