किल्ला पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी वर्धा पोलिसांनी अटकेतील संशयित राहत असलेल्या गोंड प्लॉट येथील केजाजी चौकातील तिसऱ्या मजल्यावरील घरावर छापा टाकला. तेव्हा ही टोळी किती मोठ्या प्रमाणात काम करत होती, हे पाहून पोलीस देखील चक्रावले आहेत.
यांची मोडस ऑपरेंडी खतरनाक होती. बनावट नोटा छापण्यासाठी लागणारा विशेष पेपर ऑनलाइन खरेदी करत होते. लाकडी फ्रेमचे साचे वापरून प्रिंटरच्या मदतीने पाचशेच्या नोटांची छपाई केली जात होती. पोलिसांनी या छाप्यातून एका अल्पवयीन मुलाच्या ताब्यातून पाचशेच्या १४४ बनावट नोटा, प्रिंटर, तीन लाकडी फ्रेम, कागद आणि शाईच्या बॉटल्या असे मोठे साहित्य जप्त केले.
advertisement
यापूर्वी किल्ला पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांकडून तब्बल ५ लाख ४३ हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या. दोन्ही संशयित डॉ. प्रकाश तळवेकर यांच्या घरातील तिसऱ्या मजल्यावर भाड्याने राहत होते. बनावट नोटा चलनात आणणाऱ्या या टोळीचा मूळ मास्टरमाइंड ईश्वर यादव असल्याचे उघड झाल्यानंतर आता पोलीस हा पेपर आणि शाई कुठून मागवली जात होती, याचा कसून तपास करत आहेत. या गुन्हेगारांनी सामान्य नागरिकांच्या विश्वासाला तडा देत संपूर्ण व्यवस्थेसाठी मोठे आव्हान उभे केले आहे.
