गोकुळवर ज्याची सत्ता, त्याचे जिल्ह्यात वर्चस्व... असे समीकरण कोल्हापूर जिल्ह्यात असल्याने 25 वर्ष एकहाती पकड महादेवराव महाडिक कुटुंबाने गोकुळवर ठेवली होती. त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या सतेज पाटील यांनी नेमके हेच हेरले होते. जिल्ह्यात काँग्रेसवर एकहाती पकड मिळवलेल्या सतेज पाटील यांचा 2014 मध्ये महादेवराव महाडिक यांचा मुलगा अमल महाडिक यांनी पराभव केला आणि सतेज पाटील बॅकफूटवर गेले.
advertisement
मात्र, गोकुळ ताब्यात घेतल्याशिवाय महाडिकांचे वर्चस्व मोडू शकत नाही, हे सतेज पाटील ओळखून होते. महाडिक कुटुंबाला मोठी आर्थिक ताकद आणि गावपातळीवर कनेक्टिव्हिटी गोकुळमुळे शक्य झाली होती. त्यामुळे सतेज पाटील यांनी गोकुळवर लक्ष केंद्रित केले. याच काळात जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची जोडी उदयाला आली. त्यांनी अनेक स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रित लढत काँग्रेस-राष्ट्रवादीला यश मिळवून दिले होते. त्यामुळे मुश्रीफ आणि जोडीला विनय कोरे यांना सोबत घेऊन सतेज पाटील यांनी गोकुळ संस्था ताब्यात घेतली.
गोकुळमध्ये सत्तांतर होऊन श्री शाहू परिवर्तन आघाडी म्हणजे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी स्थापन केलेल्या आघाडीकडे सत्ता आली. चार वर्षे मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी ही सत्ता एकत्रित कायम ठेवली. मात्र मुश्रीफ महायुतीत सामील झाल्याने आणि जवळपास 13 संचालक महायुतीच्या विविध पक्षाचे असल्याने महायुतीची सत्ता गोकुळवर आणण्याचा आदेश थेट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हसन मुश्रीफ यांना दिला. त्यातून मावळते अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी बंड केले. मात्र गोकुळमध्ये पक्षीय राजकारण न आणता स्थानिक पातळीवर याचा तोडगा काढण्याचा प्रयत्न सतेज पाटील आणि मुश्रीफ यांनी करत हे बंड थंड केले. त्यातून सर्वसमावेशक शशिकांत पाटील यांचे नाव पुढे केले. मात्र दक्षिण मतदारसंघात आमदार अमल महाडिक यांच्या विरोधात केलेला प्रचार त्यांना भोवला. त्यानंतर भाजप आणि सेनेच्या संचालकांची नावे पुढे आली. मात्र ती सर्वमान्य न झाल्याने नाविद मुश्रीफ याचे नाव अंतिम करण्यात आले. नाविद हे सतेज पाटलांच्या आघाडीतून निवडून आले असल्याने सतेज पाटलांनाही न दुखावता मुश्रीफ यांनी ही खेळी केली. मात्र या सगळ्या राजकीय संघर्षात सतेज पाटील युद्धात हरले तरी तहात जिंकल्याचे दिसून आले.
महाडिक कुटुंब मात्र या निवड प्रक्रियेत उघड भूमिका घेताना दिसून आले नाही. त्यांनी जर उघड भूमिका घेतली असती तर सतेज पाटलांनी तितक्याच ताकदीने जोडण्या लावत महाडिक देतील त्या नावाला विरोध केला असता. आता नविद मुश्रीफ यांची निवड झाल्याने सतेज पाटलांवर महाडिक कुटुंबाने चांगलीच टीका केलीय.
गोकुळच्या राजकारणाने महाडिक आणि मुश्रीफ यांच्यातली दरी आता कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. पक्षीय राजकारणात पक्षासोबत आणि सहकारी संस्थांत सतेज पाटलांसोबत अशी भूमिका आतापर्यंत मुश्रीफ घेत होते. मात्र यापुढच्या काळात त्यांची सतेज पाटील यांच्या सोबतची दोस्ती कायम राहणार की महाडिक आणि मुश्रीफ असे नवे राजकारण उदयाला येणार हेच पाहणे महत्वाचे असेल.