महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी पिछेहाट झाली. एकेकाळी पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा जोर असायचा. मात्र बदलेल्या राजकारणाच्या परिस्थितीत या पट्ट्यात राष्ट्रवादीला मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे पक्षाला एकामागून एक धक्के बसत आहेत. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात निवडून येण्यात समरजित घाटगे यांना अपयश आल्याने राष्ट्रवादीत राहण्याबाबत त्यांच्या मनात किंतू परंतु होते. आता महापालिका निवडणूक सरताच जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये प्रवेश करतील.
advertisement
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगांने भारतीय जनता पक्षाच्या बैठका होत आहेत. कोल्हापुरातील बैठकीला समरजीत घाटगे यांनी हजेरी लावली. यावेळी बंद खोलीत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याशी जवळपास अर्धा तास चर्चा केली. जिल्हा परिषद निवडणुकीत समरजित घाटगे गटाचे कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
समरजित घाटगे यांच्या प्रवेशावर विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यांच्या भाजप प्रवेशाची आता औपचारिकता बाकी आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावरच लढविण्याचे ठरवले आहे.
कोण आहेत समरजित घाटगे
समरजित घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे नेते आहेत
विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता
आता पुन्हा ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत
हसन मुश्रीफ यांच्याविरोधात निवडणूक जिंकण्यात त्यांना अपयश आले
हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख आहे
नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत कागलमध्ये त्यांनी हातमिळवणी केली
