पोरं गेम खेळत गेली अन् इतकं खातं रिकामं
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील दोन मुले, एक सहावीत तर दुसरा नववीत शिकणारा, 'फ्री फायर' या लोकप्रिय ऑनलाइन गेमच्या आहारी गेले होते. गेम खेळताना त्यांनी गेममधील विविध आभासी वस्तू आणि शस्त्रे खरेदी करण्यासाठी वडिलांच्या 'फोन पे' (PhonePe) खात्याचा वापर केला. वारंवार होणाऱ्या या ऑनलाइन खरेदीमुळे वडिलांच्या खात्यातून मोठी रक्कम हळूहळू कमी होत गेली.
advertisement
म्हैस घ्यायला जमा केलते 5 लाख रुपये
पालकांनी म्हशी खरेदी करण्यासाठी जमा करून ठेवलेली 5 लाख रुपयांची रक्कम खात्यातून गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. चौकशी केली असता, मुलांनी गेमसाठी ही रक्कम खर्च केल्याचे समोर आले. ऑनलाइन गेमच्या माध्यमातून होणाऱ्या अशा फसवणुकीमध्ये अनेकदा सायबर चोरट्यांचाही सहभाग असतो, जे अशा आभासी खरेदीच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार करतात. या प्रकारामुळे पालकांना मोठा मानसिक आणि आर्थिक फटका बसला असून, त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली आहे.
मुलांना पासवर्ड सांगू नका
या घटनेमुळे ऑनलाइन गेम्स आणि डिजिटल पेमेंट ॲप्सचा वापर करताना मुलांवर योग्य नियंत्रण ठेवणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पालकांनी आपल्या बँक खात्यांचे तपशील आणि पासवर्ड मुलांपासून सुरक्षित ठेवण्याचे आवाहन सायबर तज्ञांनी केले आहे.