कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त मिळावा यासाठी सर्व स्तरातून मागणी होत होती. नागरिकांचे अनेक प्रश्न खोळंबले होते. त्यातच आता के. मंजूलक्ष्मी यांनी पदभार स्वीकारल्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. पदभार स्वीकारण्याच्या दिवशी त्यांनी सुरुवातीला कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. पुढे पदभार स्वीकारून महानगरपालिकेतील सर्व विभागांच्या प्रेझेंटेशन्स पाहून मीटिंग देखील घेतल्या.
advertisement
कोल्हापूर सारख्या ऐतिहासिक शहरात आयुक्तपद
कोल्हापूरसारख्या ऐतिहासिक शहराच्या आयुक्त म्हणून काम करायला मिळणे, याचा मला अभिमान आहे. सुरुवातीला महानगरपालिका क्षेत्रातील सध्या ज्या अनेक समस्या आहेत त्या जाणून घेण्याला प्राधान्य राहील. त्यानंतर सर्वसामान्य जनतेला पाणी, रस्ते अशा मूलभूत सुविधा वेळेवर आणि योग्य पद्धतीने कशा पोहोचवता येतील याचा प्रयत्न राहील, असे आगामी धोरण असल्याचे आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी सांगितले.
Video: सैनिक करतात देशसेवा आम्ही करू त्यांची सेवा, माटे बंधूंचा अनोखा संकल्प
कोल्हापूरचे कोणकोणते प्रश्न महत्त्वाचे?
कोल्हापूर शहर पूर्णत: समस्यांच्या गर्तेत असून येणाऱ्या पर्यटकांचे कचरा आणि दुर्गंधीनेच स्वागत होत आहे. गुडघाभर खड्डे, अमृतजल योजनेसाठी रस्ते खोदण्यात आल्याने त्यांची गावच्या पाणंदीप्रमाणे झालेली अवस्था, मोडकळीस आलेली केएमटी वाहतूक, नुसत्याच आश्वासनात अडकलेली हद्दवाढ, कचरा उठाव, उद्यानांची मोडतोड, उत्पन वाढीचे आव्हान आदी समस्यांमुळे संपूर्ण शहर समस्यांच्या गर्तेत आहे.
अनेक कामे रखडली
कोल्हापूरच्या पूर्व आयुक्त कादंबरी बलकवडे यांची पुण्याला बदली झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यावर महानगरपालिका प्रभारी प्रशासक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, कोल्हापूर जिल्हाधिकारी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष आणि त्यानंतर महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून काम करताना त्यांच्यावरचा कामाचा ताण वाढला होता. त्याचबरोबर काही वेळेला धोरणात्मक निर्णय घेताना त्यांना प्रशासक म्हणून अडचणी येत होत्या. यामुळे महानगरपालिका हद्दीतील अनेक कामे रखडली आहेत.
Video : यंदा आवाज कमीच, गणेशोत्सवात डॉल्बीसाठी कडक नियम
थेट पाइपलाइन, कोल्हापुरातील खड्डे, शहरातील आरोग्यव्यवस्था, कचरा व्यवस्थापन आदी अनेक समस्या सध्या मार्गी लागण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आता नवीन आयुक्तांच्या मार्फत या सगळ्या समस्या कधी आणि कशा सुटणार याकडे सर्व कोल्हापूरकरांचे लक्ष असणार आहे.
कोण आहेत के. मंजूलक्ष्मी
के. मंजूलक्ष्मी या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. खरंतर त्या 2018 साली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. मात्र त्यानंतर दोन वर्षांनी 2020 साली त्यांनी सिंधूदुर्गच्या जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. पुढे तीन वर्ष सहा महिने जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्य बजावत त्या सर्वाधिक काळ प्रशासकीय कारभार सांभाळणाऱ्या जिल्हाधिकारी ठरल्या आहेत. कोरोना काळात त्यांनी कौतुकास्पद कामगिरी बजावली होती. तर त्यांच्या कार्यकाळात स्वच्छ भारतमध्ये देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याने देशात पहिल्या क्रमांक मिळवला होता. यासाठी दिल्ली येथे सत्कार सोहळाही पार पडला होता.