कोल्हापूर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. याचा फटका थेट कोल्हापुरातील पर्यटन व्यवसायाला बसला आहे. या घटनेने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अनेकांनी आपली काश्मीरची सहल रद्द केली आहे. तर काहींनी सहली अर्धवट सोडून परतण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, कोल्हापुरातील ट्रॅव्हल्स कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यातून जम्मू-काश्मीरसारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात सहलींचे आयोजन केले जाते. जिल्ह्यात सुमारे 20 ते 22 ट्रॅव्हल्स कंपन्या अशा सहलींचे नियोजन करतात. यामध्ये दरवर्षी सुमारे 100 ते 120 सहली आयोजित केल्या जातात. प्रत्येक आठवड्याला एक ग्रुप पाठवला जातो, जो आठ दिवसांची सहल करून परततो आणि त्यानंतर पुढचा ग्रुप रवाना होतो. हे नियोजन दोन महिने आधीपासून सुरू होते.
IPS बिरदेव डोणे! मेंढपाळाच्या पोऱ्या असा झाला सायब, प्रत्येकांनी पाहावा असा VIDEO
सध्या शालेय परीक्षांचे सत्र संपल्याने आणि मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे कुटुंबांसह प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे 15 मे पर्यंत जवळपास सर्व ट्रॅव्हल्स कंपन्यांनी जम्मू-काश्मीरसाठी सहलींचे बुकिंग पूर्ण केले होते. पण, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे या सर्व नियोजनाला मोठा धक्का बसला आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील टूर एजंट संदीप शिंदे यांनी सांगितले, “हल्ल्यानंतर अनेक नागरिकांनी भीतीपोटी सहली रद्द केल्या आहेत. जे पर्यटक सध्या जम्मू-काश्मीरमध्ये आहेत, त्यांनाही सहली अर्ध्यावर सोडून परतावे लागत आहे. यामुळे ट्रॅव्हल्स कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे.”
अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोनमर्ग हे पर्यटन स्थळ आधीच बंद करण्यात आले आहे. पण श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम आदी ठिकाणांसाठी कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणावर बुकिंग झाले होते. या हल्ल्यामुळे काही पर्यटकांनी आपल्या सहली पुढे ढकलल्या असल्या तरी बहुतांश पर्यटकांनी त्या रद्द केल्या आहेत.
कोल्हापूरमधील एका प्रमुख ट्रॅव्हल्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या जम्मू-काश्मीरसाठीच्या तब्बल 20 सहली रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. “सध्याच्या असुरक्षित वातावरणामुळे पर्यटकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे,” असे या कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले.
सध्या कोल्हापूरमधील अनेक ट्रॅव्हल्स कंपन्या गोवा, केरळ, दार्जिलिंग, सिक्कीम यांसारख्या पर्यायी पर्यटन स्थळांचा विचार करत आहेत. परंतु जम्मू-काश्मीरच्या अनुभवाला पर्याय मिळणे कठीण असल्यामुळे पर्यटकांचा प्रतिसाद कमी आहे. पर्यटन व्यावसायिकांनी लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये स्थिती सामान्य होईल आणि पुन्हा एकदा पर्यटकांचा विश्वास मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.