पुणे-मुंबईनंतर आणखी एक महामार्ग ठप्प! कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा, काय घडलं?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Kolhapur Pune Traffic: पुणे-बेंगळुरू महामार्गावरील कोल्हापूर नजीकच्या किनी टोल नाका परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
कोल्हापूर: पुणे-मुंबई महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूक तब्बल 33 तासांनी सुरू झाली. मात्र, दोन दिवसांपासून वाहतूक ठप्प झाल्याने महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली आहे. वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागण्यापूर्वीच पुन्हा डोकेदुखी वाढली आहे. राज्यातील आणखी एका महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. पुणे-बेंगळुरू महामार्गावरील कोल्हापूर नजीकच्या किनी टोल नाका परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
पुण्याहून कांद्याने भरलेला ट्रक हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथील ओढ्याच्या पुलाजवळच पलटी झाला. आज सकाळी घडलेल्या या घटनेमुळे ट्रकमधील कांदा सगळ्या रस्त्यावर विखुरला गेला. त्यामुळे पुण्याकडून येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे किनी टोलनाका ते कराडमार्गावर वाहतूक खोळंबल्याचे चित्र आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
दरम्यान, अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. कागल ते सातारा दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. घुणकी नजीकच्या ओढ्यावरील पूर्वेकडील पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या पश्चिमेकडील पुलावरूनच दुहेरी वाहतूक सुरू आहे. याठिकाणी पुण्याकडून येणाऱ्या वाहनांना अचानक पश्चिमेकडील पुलावर वळावे लागते. त्यामुळे वाहनावरील ताबा सुटतो आणि वाहन पलटी होण्याचे आणि अपघाताचे प्रकार घडत आहेत. यापूर्वी झालेल्या अपघातात काहींना जीवही गमवावा लागला होता.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 10:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
पुणे-मुंबईनंतर आणखी एक महामार्ग ठप्प! कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा, काय घडलं?









