IPS बिरदेव डोणे! मेंढपाळाच्या पोऱ्या असा झाला सायब, प्रत्येकांनी पाहावा असा VIDEO
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
रानोमाळ भटकंती करणाऱ्या एका मेंढपाळाच्या मुलाने आपल्या जिद्दीने आणि अथक मेहनतीने कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कागल तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी होण्याचा बहुमान त्याने कमावला आहे.
कोल्हापूर : खांद्यावर घोंगडे, डोक्यावर टोपी, काखेत लोकरीचा काचोळा आणि पायात जाडजूड पायतान घालून मेंढ्या चारण्यासाठी रानोमाळ भटकंती करणाऱ्या एका मेंढपाळाच्या मुलाने आपल्या जिद्दीने आणि अथक मेहनतीने कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कागल तालुक्यातील यमगे गावचा 27 वर्षीय बिरदेव डोने याने 2024 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात 551 वा क्रमांक मिळवत कागल तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी होण्याचा बहुमान त्याने कमावला आहे. मंगळवारी निकाल जाहीर होताच यमगे गावात जल्लोष साजरा झाला, जरी बिरदेव सध्या बेळगाव जिल्ह्यातील मामाच्या गावी असला तरी त्याच्या यशाने गावकऱ्यांना अभिमानाने छाती फुलली.
कष्टमय जीवन आणि शिक्षणाचा प्रवास
बिरदेव डोने याचा जन्म यमगे गावातील एका सामान्य मेंढपाळ कुटुंबात झाला. त्याचे वडील सिद्धापा डोने यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून, मेंढपाळ व्यवसायातून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. बिरदेवची आई बाळाबाई, विवाहित बहीण आणि भाऊ वासुदेव असे त्याचे कुटुंब आहे. चार वर्षांपूर्वी वासुदेव भारतीय सैन्यात भरती झाल्याने बिरदेवच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळाली. लहानपणापासून बिरदेवला मेंढ्या चारण्यात वडिलांना हातभार लावावा लागायचा. पण त्याच्या मनात शिक्षणाची आणि मोठे अधिकारी होण्याची जिद्द कायम होती.
advertisement
Pahalgam Terror Attack : 'आम्हाला जिवंतपणी मारलं' रुपाली ठोंबरेंनी सांगितली 'पहलगाम'मधील दुसरी बाजू!
बिरदेवचे प्राथमिक शिक्षण यमगे येथील विद्यामंदीर शाळेत, माध्यमिक शिक्षण जयमहाराष्ट्र हायस्कूल यमगे येथे, तर उच्च माध्यमिक शिक्षण मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये झाले. त्याने पुण्याच्या प्रतिष्ठित कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (सीओईपी) मधून इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. यूपीएससीच्या तयारीसाठी त्याने दिल्लीत नेक्स्ट आयएएस आणि वाजीराम क्लासेसमध्ये मार्गदर्शन घेतले. तिथे त्याने दिवसाला 22 तास अभ्यास करत अथक परिश्रम घेतले.
advertisement
हुशारी आणि जिद्दीची कमाल
बिरदेव लहानपणापासूनच हुशार होता. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत तो मुरगूड केंद्रात प्रथम आला. विशेष म्हणजे, गणित विषयात त्याला दोन्ही परीक्षांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले. इयत्ता पाचवीत नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत अपयश आल्यानंतरही त्याने खचून न जाता मोबाइल, टीव्ही आणि खेळ यापासून स्वतःला अलिप्त ठेवले आणि केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. त्याच्या या चिकाटीमुळे तो नेहमीच अव्वल राहिला.
advertisement
यूपीएससीची तयारी करताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दिल्लीत अभ्यासासाठी दरमहा 10-12 हजार रुपये खर्च करणे वडिलांना कठीण जात होते. वडिलांनी त्याला नोकरी करण्याचा सल्ला दिला, पण बिरदेवने ठामपणे सांगितले, मी यूपीएससी यशस्वी होणारच! त्याच्या आत्मविश्वासाला आणि मेहनतीला निकालाने पुष्टी दिली. काही दिवसांपूर्वी त्याने गावातील मित्र यश घाटगे याला सांगितले होते, माझे ध्येय अंतिम टप्प्यात आहे. इंटरव्ह्यू झाला आहे. निवड निश्चित आहे. त्याचा हा विश्वास खरा ठरला.
advertisement
गावात जल्लोष, कुटुंबाचा अभिमान
मंगळवारी यूपीएससीचा निकाल जाहीर होताच यमगे गावात आनंदाला उधाण आले. बिरदेवच्या मित्रांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला. त्याच्या वडिलांनी सांगितले, आम्ही मेंढपाळ आहोत. आम्हाला फक्त मेंढ्या चारता येतात. पण माझ्या मुलाने आमचे स्वप्न पूर्ण केले. तो आता देशाची सेवा करेल, याचा आम्हाला अभिमान आहे. गावातील सरपंचांनीही बिरदेवला गावाचा आदर्श ठरवले. बिरदेवच्या आई बाळाबाई यांनी आनंदाश्रूंनी मुलाच्या यशाचे स्वागत केले.
advertisement
तरुणांसाठी प्रेरणा
बिरदेवची कहाणी प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. आर्थिक अडचणी, सामाजिक मर्यादा आणि सुविधांचा अभाव यांना न जुमानता मेहनत आणि आत्मविश्वासाने स्वप्ने साकार करता येतात, हे त्याने दाखवून दिले. तो म्हणतो, शिक्षण आणि परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही कोणत्या परिस्थितीतून आला आहात, हे महत्त्वाचे नाही; तुम्ही काय साध्य करू शकता, हे महत्त्वाचे आहे. त्याच्या यशाने यमगे गावाचे नाव देशभरात पोहोचले आहे.
advertisement
भविष्यातील उद्दिष्ट
आयपीएस अधिकारी म्हणून बिरदेव आता देशसेवेसाठी सज्ज आहे. विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. माझ्यासारख्या अनेक तरुणांना संधीची गरज आहे. मी त्यांना प्रेरणा देऊ इच्छितो आणि त्यांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी मदत करेन, असे तो म्हणाला.
बिरदेव डोने याच्या यशाने केवळ त्याच्या कुटुंबाला आणि गावाला नव्हे, तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला अभिमान वाटत आहे. मेंढपाळाच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आयपीएस अधिकारी होण्याचा मान मिळवला, ही कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्याच्या कष्टाने आणि जिद्दीने त्याने स्वतःसोबतच आपल्या गावाला एक नवी ओळख दिली आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
April 24, 2025 10:03 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
IPS बिरदेव डोणे! मेंढपाळाच्या पोऱ्या असा झाला सायब, प्रत्येकांनी पाहावा असा VIDEO

