कोल्हापूर : जीवनात आपल्या पाठीशी आपल्या आई-वडिलांची साथ असेल तर आपण पुढे वाटचाल करण्यास नेहमीच प्रोत्साहित राहत असतो. अशातच मध्येच आई-वडिलांची साथ सुटली, तर बरेच जण आयुष्यात तुटून जातात. मात्र कोल्हापुरातील एक तरुण आई वडिलांच्या निधनानंतर अगदी कमी वयातच वाट्याला आलेले दुःख बाजूला सारत स्वतःच्या पायावर उभारण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे. आई-वडिलांच्या छत्राविना जगत असतानाच तो स्वतःची एक छोटेखानी नर्सरी चालवत आहे. मात्र विशेष म्हणजे व्यवसाय करत असताना स्वतःचे शिक्षणही त्याने थांबू दिलेले नाही.
advertisement
कोल्हापूरच्या राजारामपुरीच्या तेराव्या गल्लीत घाटगे कुटुंबातील यश हा तरुण राहतो. 2021 मध्ये यश अकरावीमध्ये शिकत असताना फक्त 3 महिन्यांच्या अंतरातच त्याची आई आणि नंतर वडील असेल दोघांचेही निधन झाले. तरुण वयातच आई बापाचे छत्र हरपल्यानंतर यशला काय करावे, हेच सुचत नव्हते. मात्र एकाकी जीवन जगताना यशला बहीण आणि दाजींनी खंबीर साथ दिली. त्यामुळेच अर्थार्जनासाठी त्याने विविध पर्याय अवलंबले. राहण्यासाठी स्वतःचे घर असले तरी बाकीच्या सर्व गोष्टी त्याला स्वतः एकट्यालाच कराव्या लागत होत्या. त्यामुळे विविध ठिकाणी काम करत त्याने आपले शिक्षण सुरूच ठेवले. त्यामुळेच त्याला आजूबाजूच्या लोकांकडूनही प्रोत्साहन मिळत आहे.
दारातील छोट्या नर्सरीतूनच करतो अर्थार्जन
विविध ठिकाणी काम करत असताना शिक्षणासाठी आणि 2 वेळच्या जेवणासाठी यशला पैसे कमी पडू लागले. यावर उपाय म्हणून यशच्या बहीण आणि दाजी यांनी त्याला मदत केली. यशचे दाजी साखर जगताप यांनी त्याला घरात समोरील छोट्या जागेतच एक नर्सरी सुरू करण्याचा सल्ला दिला. त्याला त्या संदर्भात मार्गदर्शन आणि मदतही केली. सध्या त्याच्या नर्सरीतील फळ, फुलांची रोपे विकून मिळणाऱ्या पैशांवर यश उदरनिर्वाह करत आहे.
व्यवसाय आणि शिक्षणाचा समतोल
आज-काल शिक्षण सुटण्यासाठी बऱ्याचशी कारणे तरुणांकडून दिली जातात. मात्र यश घाटगे हा तरुण त्यासाठी अपवाद ठरला आहे. आपल्या आई-वडिलांच्या निधनानंतर आपले शिक्षण त्याने कधीही थांबू दिलेले नाही. सध्याही नर्सरीचा व्यवसाय करत असतानाच तो बीकॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. कॉलेजची वेळ आणि व्यवसायाचा समतोल राखता यावा, यासाठी त्याने नाईट कॉलेजचा पर्याय अवलंबला आहे. त्यामुळे दिवसभर आपली छोटेखानी नर्सरी सांभाळून तो संध्याकाळी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.
बापाचं छत्र हरवलं, जागा नसल्याने बाथरुममध्ये अभ्यास; पण उजमानं करुन दाखवलं!
मोठी नर्सरी सुरू करण्याचे स्वप्न
सध्या यश त्याच्या नर्सरीत या क्षेत्रातील बारीकसारीक गोष्टी शिकत आहे. शिक्षण पूर्ण करून नर्सरी संदर्भातीलच अजून माहिती आणि ज्ञान मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून स्वतःची मोठी नर्सरी सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, अशा भावना यश घाटगे याने व्यक्त केल्या आहेत. तर मदत म्हणून फक्त नर्सरीला भेट देऊन एखादे रोप विकत घेण्याचे आवाहन देखील यशने केले आहे.
पतीनं दिली खंबीर साथ, अन् मुक्त विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या महिलेची MPSC मध्ये क्लास 1 पदाला गवसणी!
दरम्यान सध्याच्या युगात तरुण वयात विविध चुकीच्या सवयी लावून घेऊन कित्येक तरुण आपले आयुष्य बरबाद करत असतात. मात्र यशला कोणत्याही पद्धतीची चुकीची सवय नाही आहे, एकटा राहत असून देखील तो कष्टाने नर्सरी आणि शिक्षण या दोन्हीसाठीही मेहनत घेत असल्यामुळे सर्वच नातेवाईक आणि मित्रमंडळींनी त्याचा अभिमान वाटत असल्याचे मत व्यक्त केले आहे.