अनंत चतुदर्शीच्या दिनी मुंबईसह राज्यात गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला होता. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांचे रात्रीपर्यंत गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले. शनिवारी, सकाळी 10 वाजता लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघाली होती.
लालबाग, चिंचपोकळी, भायखळा, गिरगाव अशा मार्गाने लालबागचा राजाचे विविध ठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले.
advertisement
लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु झाली. या दरम्यान राजा मंडपातून बाहेर पडला होता. लालबागच्या राजाचं यंदाचं विसर्जन हे अत्यंत खास आणि आधुनिक पद्धतीने करण्यात येणार आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी 360 डिग्री फिरणारा तराफाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे बाप्पाचे विसर्जन करताना आणखी सोयीस्कर होणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा तराफा मोठा देखील आहे. त्याशिवाय, स्कुबा डायव्हर्सही सज्ज झाले आहेत.
गिरगाव चौपाटीवर आणखी काही मंडळांच्या बाप्पा विसर्जनासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे गिरगाव चौपाटीवर भक्तांची अलोट गर्दी उसळली आहे. विसर्जन मिरवणुकीला 20 तासांहून अधिक काळ लोटल्यानंतरही गिरगाव चौपाटीवर भक्तांची गर्दी उसळली आहे.
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी...
मागील 10 दिवसांपासून तहानभूक विसरुन बाप्पाची सेवा करण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. आज त्या बाप्पााला निरोप देताना कार्यकर्ते आणि भाविकांना अश्रू अनावर झाले.