जवळपास 22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजाची मिरवणूक वाजतगाजत गुलाल उधळत गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. बाप्पााच्या निरोपाची तयारी सगळी पूर्ण झाली. मात्र, भरतीच्या बदललेल्या वेळेमुळे विसर्जनाचे गणित बिघडले.
आज सकाळी लालबागचा राजा चौपाटीवर दाखल झाल्यावेळी भरतीचे पाणी वेगाने वाढत होते. मूर्ती समुद्रकिनाऱ्यावर आणल्यानंतर विसर्जनासाठी सजवलेला तराफा आणि मूर्ती ठेवलेला पाट यांची भरतीच्या उंच लाटांमुळे जुळवणी होत नव्हती. भरतीचे पाणी इतके वाढले की मूर्तीचा पाट समुद्रात तरंगू लागला.
advertisement
कोळी बांधवांचे प्रयत्न...
या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोळी बांधव गेल्या दीड तासांपासून आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यांनी दोन्ही बाजूंनी पाट आणि तराफा स्थिर करण्याचा प्रयत्न केला, मात्र भरतीच्या प्रचंड वेगवान लाटा त्यात अडथळा ठरत आहेत. परिणामी विसर्जनाची प्रक्रिया थांबवून भरतीचे पाणी आटण्याची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवातील सर्वात मानाचा मानला जाणारा 'लालबागचा राजा' विसर्जनाचा क्षण पाहण्यासाठी चौपाटीवर भाविकांची प्रचंड गर्दी आहे.आता समुद्राचे पाणी ओसरल्यानंतरच विसर्जनाची मुख्य प्रक्रिया पार पडणार आहे.
ओहोटीनंतर विसर्जन...
भरतीचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा मूर्तीचा पाट आणि तराफा जुळवण्यात येणार आहे. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ओहोटी सुरू होणार आहे. पाण्याचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात येणार आहे. तराफावर मूर्ती आल्यानंतर विसर्जनास सुरुवात होणार आहे.