मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी किरण सूर्यवंशी हे एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. याच दरम्यान त्यांची ओळख झाली आणि मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याचे भासवून आरोपीने तरुणीचा विश्वास संपादन केला. सुमारे पाच महिन्यांपूर्वी आरोपी किरणने तरुणीला उदगीर शहरातील उमा चौकातील साईकृपा लॉज येथे बोलावले.
तेथे गेल्यानंतर आरोपीने तरुणीला 'तू मला खूप आवडतेस, तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवू दे,' असे सांगून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र, तरुणीने त्याला स्पष्टपणे नकार दिला. तरुणीचा नकार ऐकून आरोपी संतापला आणि त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीवर त्याने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. ही गोष्ट कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकीही त्याने तरुणीला दिली.
advertisement
या घटनेनंतरही आरोपी किरण सूर्यवंशी तरुणीला वारंवार त्रास दिला. ‘आपण लवकरच लग्न करू आणि आपला सुखाचा संसार थाटू,’ असे खोटे आश्वासन देऊन त्याने तिला आपल्या जाळ्यात अडकवून ठेवले. मात्र, काही दिवसांनी त्याने पुन्हा धमक्या देणे सुरू केले. 'तू माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, नाहीतर तुझा जीव घेईन,' अशा शब्दात तो तरुणीला धमक्या देऊ लागला.
आरोपीच्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने आपल्या कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तात्काळ शनिवारी (१३ सप्टेंबर) उदगीर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी किरण सूर्यवंशीला ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.