PTI वृत्तसंस्थने दिलेल्या वृत्तानुसार- घनश्याम उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेत महाराष्ट्रातील भाषा वादामुळे निर्माण झालेल्या तणावात राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
घनश्याम उपाध्याय यांनी असा दावा केली आहे की- हिंदी भाषा वापरणाऱ्या नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कारवाईची मागणी करत अधिकाऱ्यांकडे एक तक्रार सादर केली होती. मात्र तक्रारीनंतरही राज ठाकरे यांच्या विरोधात कोणतीही कारवाई किंवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे अत्यंत आवश्यक अशा पद्धतीने ही जनहित याचिका दाखल करण्यात येत आहे.
advertisement
ही याचिका अशा वेळी दाखल झाली आहे; जेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी भाषेच्या मुद्यावरून काही लोकांवर हल्ला केल्याच्या, त्यांची दुकाने आणि मालमत्ता उद्ध्वस्त केल्याच्या विशेषतः मराठी न बोलणाऱ्यांना लक्ष्य केल्याच्या – अनेक घटना समोर आल्या आहेत.
याचिकेत म्हटले आहे की- राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणांमुळे लोकांना रस्त्यावर उतरायला प्रवृत्त केले जात आहे आणि हिंदीविरोधातून सुरू झालेल्या वादामुळे मराठी भाषा त्या लोकांवर लादली जात आहे, जे मराठी बोलत नाहीत किंवा इतर राज्यांतून आलेले आहेत.
या याचिकेमध्ये राज ठाकरे आणि त्यांचे चुलत भाऊ व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याद्वारे 5 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या विजय रॅलीचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी मराठी न बोलणाऱ्यांना त्यांच्या कानाखाली वाजवणे योग्य आहे, असे विधान केल्याचा दावा करण्यात आला आहे.
राज ठाकरे यांचे प्रेम आणि आपुलकी ही खऱ्या अर्थाने मराठी भाषेसाठी नसून मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीत राजकीय फायदा घेण्यासाठी हे नाट्य मुद्दाम उभे करण्यात येत आहे. त्यांच्या कृतीमागे मराठीची चिंता नाही तर निवडणुकीतील मतं मिळवण्याची व्यूहरचना आहे, असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.
शुक्रवारी राज ठाकरे यांनी एका रॅलीत महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीने लागू करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाचा तीव्र विरोध केला होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षणात त्रिभाषा धोरण लागू करण्यासंदर्भात केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की, जर इयत्ता 1 ली ते 5 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर हिंदी भाषा लादली गेली, तर मनसे शाळा बंद पाडेल.
केंद्र सरकार हिंदीला तिसरी भाषा म्हणून देशभरात स्थान देण्याचा प्रयत्न करत आहे. पण तामिळनाडूपाठोपाठ महाराष्ट्रातही यावरून राजकारण तापले आहे. एकीकडे उद्धव ठाकरे मराठी अस्मितेच्या मुद्यावर सरकारविरोधात आक्रमक आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनीही संघर्षाचे रणशिंग फुंकले आहे.