लोणार सरोवराच्या अति क्षारयुक्त पाण्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात जिवंत मासे आढळले आहे. उल्कापाताच्या आघातातून तयार झालेले लोणार सरोवर हे जगातील तिसरं आणि खाऱ्या पाण्याचं एकमेव सरोवर आहे. या खाऱ्या पाण्यात असलेल्या अतिक्षारांमुळे कुठलाच जीव या पाण्यात जिवंत राहू शकत नव्हता.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून पावसाचे पाणी आणि शहरातील सांडपाणी थेट लोणार सरोवराच्या पाण्यात मिसळल्याने लोणार सरोवराची जैवविविधता धोक्यात आली आहे. लाखो वर्षांपूर्वी अंतराळातून एक मोठा अश्णी बुलढाण्यातील लोणारमध्ये येऊन धडकला. यामुळे नैसर्गिकरित्या जगातील अद्वितीय खाऱ्या पाण्याचे सरोवर तयार झाले. मात्र या सरोवरातील खाऱ्या पाण्यातील क्षार कमी झाल्याने लोणार सरोवरातील पाण्याचे जैव महत्त्व धोक्यात आले आहे. या संपूर्ण गंभीर बाबीकडे संबंधित यंत्रणा अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत.
advertisement
हा प्रकार समोर आल्यानंतर लोणार येथील मी लोणारकर टीमचे पर्यावरण प्रेमी सचिन कापूरे यांनी थेट लोणार सरोवर गाठून या पाण्याची लिटमस टेस्ट केली. यावेळी पाण्यातील पीएच लेवल सात ते आठच्या दरम्यान असल्याचं निष्पन्न झालं. विशेष म्हणजे यापूर्वी या पाण्याचा पीएच दहापेक्षा अधिक होता. त्यामुळे या पाण्यात कोणताही जिवंत जीव नव्हता. पण आता या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात माशांची पैदास झाली आहे.. मात्र ही पैदास लोणार सरोवराच्या जैवविविधतेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
