लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांत मतदानाची टक्केवारी जरी घटली असली तरी मात्र चौथ्या टप्प्यात झालेल्या रावेर लोकसभा मतदारसंघात 2019 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. 2019 मध्ये रावेर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी 61.40% होती तर यावेळी मात्र रावेर लोकसभा मतदारसंघात 64.28 टक्के मतदान झाले आहे.
रावेरमधील कळीचे मुद्दे
रावेर लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचा केळी पिक विम्याचा प्रश्न, वेळेवर आधारित उद्योग व्यवसाय, बेरोजगारी, विकासात्मक कामे तसेच सिंचन योजनेची कामे हे या निवडणुकीत कळीचे मुद्दे पाहायला मिळाले. यावरूनच दोन्ही उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप देखील रंगले होते. रावेर लोकसभा मतदारसंघाची राजकीय परिस्थिती पाहता एकनाथ खडसे यांचा हा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे या मतदारसंघावर एकनाथ खडसे यांचे मोठे प्राबल्य आहे.
advertisement
तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात उमेदवारीवरून जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील व माजी आमदार संतोष चौधरी यांच्यात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. पण ऐनवेळी पक्षाकडून रावेर मधील उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने संतोष चौधरी यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराजी नाट्य देखील पाहायला मिळाले.
2019 मध्ये रक्षा खडसेंचा विजय -
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून रक्षा खडसे तर काँग्रेस कडून डॉ. उल्हास पाटील यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी तीन लाखापेक्षा अधिक मताधिक्याने रक्षा खडसे यांचा विजय झाला होता.
