पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
- Published by:Chetan Bodke
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
पुणे शहरात कॉल फॉरवर्डिंगच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगार आता मोबाईल नेटवर्कमधील कॉल फॉरवर्डिंग सुविधा वापरून नागरिकांची फसवणूक करत आहेत.
शहरात कॉल फॉरवर्डिंगच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगार आता मोबाईल नेटवर्कमधील कॉल फॉरवर्डिंग सुविधा वापरून नागरिकांची फसवणूक करत आहेत. यामुळे अनेक नागरिक आर्थिक नुकसान आणि वैयक्तिक माहितीच्या चोरीचा बळी ठरत आहेत.
सायबर  तज्ञ निरंजन भुस्नाळे यांनी सांगितले की, गुन्हेगार नागरिकांना विविध कारणांनी — जसे की केवायसी अपडेट, बँक खात्याची पडताळणी, मोबाईल नेटवर्क अपग्रेड किंवा सिम ब्लॉक टाळण्यासाठी — एक विशिष्ट नंबर डायल करण्यास सांगतात. तो नंबर डायल केल्यानंतर मोबाईलमधील कॉल फॉरवर्डिंग सक्रिय होते, ज्यामुळे येणारे सर्व कॉल गुन्हेगारांकडे वळवले जातात. त्यानंतर हेच गुन्हेगार ओटीपी आणि इतर संवेदनशील माहिती मिळवून बँक व्यवहारात फेरफार करतात.अनेक प्रकरणांमध्ये गुन्हेगारांनी केवळ काही मिनिटांत हजारो रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
advertisement
पुणे सायबर पोलिसांकडे मागील काही महिन्यांत अशा घटनांच्या तक्रारी वाढल्या आहेत. सायबर पोलिसांनी नागरिकांना कॉल फॉरवर्डिंगची कोणतीही विनंती आल्यास ती तत्काळ नाकारावी, तसेच कोणालाही ओटीपी, बँक खाते क्रमांक किंवा आधार माहिती देऊ नये, असा इशारा दिला आहे
अशी घ्या काळजी
मोबाईलमधील “##002#” हा कोड डायल करून सक्रिय कॉल फॉरवर्डिंग बंद करता येते, असे सायबर तज्ज्ञांनी सांगितले. नागरिकांनी नियमितपणे आपले फोन सेटिंग तपासावे, आणि संशयास्पद कॉल किंवा संदेश आल्यास सायबर क्राईम हेल्पलाइन 1930 वर किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 31, 2025 9:32 PM IST

 
              