चाळीसगाव : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलं. यानंतर उन्मेश पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला. उन्मेश पाटील यांचं तिकीट का कापलं? याचं कारण सांगताना भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. प्रवीण चव्हाण प्रकरणात उन्मेश पाटील यांचा हस्तक्षेप होता म्हणून पक्षाने त्यांचं तिकीट कापलं, असा आरोप भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे.
advertisement
चाळीसगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्यात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी उन्मेश पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. योग्यवेळ आल्यावर उन्मेश पाटील यांनी काय उपदव्याप केले, हे सांगावं लागेल, असं मंगेश चव्हाण म्हणाले. मुख्य म्हणजे गिरीश महाजन यांच्यासमोरच मंगेश चव्हाण यांनी उन्मेश पाटील यांचं तिकीट कापण्याचं कारण सांगितलं.
उन्मेश पाटील यांचं लोकसभेचं तिकीट मी किंवा गिरीश महाजनांनी कापलेलं नाही. तुम्ही चुका करू नका, अशा सूचना पक्षाने वारंवार उन्मेश पाटील यांना दिल्या. ठेकेदारांना ब्लॅकमेल करू नका, अशा सूचना पक्षाने वारंवार उन्मेश पाटील यांना दिल्या. उन्मेश पाटील यांनी चाळीसगावमध्ये कत्तलखाना व्हावा, यासाठी काय तडजोडी केल्या हे वरिष्ठांना कळालं, असा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला.
पुण्याच्या ऍडव्होकेट प्रवीण चव्हाण यांनी जे केलं त्याची सर्व कागदपत्र चाळीसगाववरून पुरवली गेली होती. त्याचे सर्व पुरावे आणि व्हिडिओ संबंधितांकडे पोहोचले आहेत. हे सर्व करूनही उन्मेश पाटील माझ्यावर अन्याय झाला बोलतात, त्यांनी आत्मपरिक्षण करावं, आपण काय चुकलो, असा टोला मंगेश चव्हाण यांनी लगावला आहे.
महाजनांचाही निशाणा
'निवडून येण्यासारखी परिस्थिती असती तर उन्मेश पाटील यांनी स्वत: तिकीट घेतलं असतं, मात्र परिस्थिती विरुद्ध असल्याने उन्मेश पाटील यांनी करण पवारला बळीचा बकरा केला,' अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. उन्मेश पाटील उबाठामध्ये गेले त्यामुळे आता उबाठाचा कसा फाफुटा उडतोय तो बघा, असा टोलाही गिरीश महाजन यांनी लगावला.
