परळी येथील तहसील कार्यालयाजवळील पटांगणात महादेव मुंडे यांची तीक्ष्ण हत्याराने निर्घृण हत्या करण्यात आली होती. घटनेला दोन वर्षांचा कालावधी होत आला आहे. या प्रकरणाचा तपास एस आय टी कडून सुरू आहे. परंतु त्याला आता गती देण्याची मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे यासाठी मुख्यमंत्र्यांनीच पुन्हा एकदा लक्ष घालावे अशी देखील विनंती त्यांनी केली आहे.
advertisement
मुख्यमंत्र्यांनीच पुन्हा एकदा लक्ष घालण्याची विनंती
मनोज जरांगे आमच्यासोबत असून, आरोपी फासावर जाईपर्यंत ते आमच्यासोबत राहणार असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले आहे. तसेच या लढ्यात खासदार बजरंग सोनवणे, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार सुरेश धस हे आमच्या सोबत असले तरी अद्याप आरोपी मात्र अटक झालेला नाही याचे दुःख जास्त आहे, असे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलं आहे..
आरोपींना अटक होईपर्यंत न्यायाचा लढा चालूच राहणार: ज्ञानेश्वरी मुंडे
आरोपींना अटक होईपर्यंत न्यायाचा लढा चालूच राहणार असल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले. पोलिस तपासावर समाधानी नाही आरोपींना पकडून शिक्षा होऊन न्याय मिळेपर्यंत आपला लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
महादेव मुंडे यांची 21 ऑक्टोबर 2023 रोजी परळी शहरातील तहसील कार्यालयासमोर निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. 20 ऑक्टोबर 2023 रोजी ते मुलांना ट्यूशनमधून घरी सोडून गेले होते. त्यानंतर रात्री त्यांचे रक्त लागलेले मोटरसायकल वन विभागाच्या कार्यालयाजवळ सापडले. दुसऱ्या दिवशी सकाळी (21 ऑक्टोबर) त्यांचा मृतदेह मोटरसायकलपासून 50 मीटर अंतरावर सापडला. पोस्ट मॉर्टम रिपोर्टनुसार, त्यांचा गळा चिरण्यात आला होता आणि त्यांच्या शरीरावर, पाठीवर आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. या प्रकरणाला 18 महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी, आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.