उल्हासनगरच्या सुभाष टेकडी भागात एका रिक्षेतून बॅग भरून हे पैसे काही अज्ञात घेऊन चालले होते, त्यावेळी अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी या रिक्षेचा पाठलाग केला आणि ही रिक्षा थांबवली. या रिक्षामध्ये पैशांनी भरलेली बॅग आढळून आली. यानंतर रिक्षातील अज्ञात तरुणांना पकडून पोलीस चौकीत नेण्यात आलं. या प्रकारानंतर पोलीस चौकीसमोर गर्दी झाली आणि मोठा राडा झाला.
advertisement
भाजप उमेदवारांसाठी हे पैसे पाठवल्याचा आरोप अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी केला आहे. दरम्यान पोलिसांनी पैसे घेऊन आलेल्या तरुणांना ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू झाली आहे.
नालासोपाऱ्यातही कारवाई
दरम्यान नालासोपारा पूर्व भागातील पेल्हार येथे पैसे पकडण्यात आले आहेत. हे पैसे भाजपचे असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे, पण भाजपने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. बहुजन विकास आघाडीचा हा स्टंट असल्याची प्रतिक्रिया भाजप उमेदवार मनोज पाटील यांनी केली आहे.
वॉशिंग मशीन जप्त
पिंपरी-चिंचवडमध्ये भरारी पथकाने 19 वॉशिंग मशिन जप्त केली आहेत. रहाटणी इथल्या गणराज कॉलनी भागात भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. रहाटणी येथील गणराज कॉलनीमध्ये मतदारांना वॉशिंग मशीन वाटप केलं जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती, त्यानंतर 12 जानेवारीला रात्री 10.23 च्या सुमारास भरारी पथकाने 19 वॉशिंग मशिन जप्त केली.
महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांमध्ये 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या मतदानाआधी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. 15 जानेवारीला मतदान पार पडल्यानंतर लगेचच 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
