भाजपचे खासदार असलेले अशोक चव्हाण यांच्या मुली विरोधात काँग्रेसने तिरुपती बाबुराव कदम कोंडीकर यांना उमेदवारी दिली आहे. कोंडीकर एनएसयुआयपासून ते काँग्रेस पक्षात काम करत आहेत. सध्या नांदेडचे ते जिल्हा कार्याध्यक्ष आहेत. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर कोंडीकर यांनी भोकरमध्ये संघटना बांधणी केली. काँग्रेस पक्षाचे आक्रमक कार्यकर्ते म्हणून त्यांची स्थानिक पातळीवर ओळख आहे.
advertisement
तिरुपती बाबुराव कदम कोंडीकर हे मराठा समाजातून येतात. या मतदारसंघात जरांगे फॅक्टर हा महत्त्वाचा रोल असणार आहे. मराठा आरक्षणावरून अनेक वेळा अशोक चव्हाण आणि त्यांच्या मुलीच्या गाड्या अडविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भोकरमध्ये मराठा समाजाचे मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील भोकरमध्ये उमेदवार दिला तर मतदारसंघातील समीकरणेदेखील बदलतील.
लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव करून काँग्रेसचा उमेदवार विजयी झाल्याने स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना पुन्हा एक धक्का देण्यासाठी काँग्रेस सज्ज झाले आहे.
काँग्रेसचे उमेदवार जाहीर
भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी तसेच ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशा सगळ्यांच्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर प्रचंड प्रतिक्षेनंतर काँग्रेस पक्षाने ४८ नावांची पहिली यादी जाहीर केली. नाना पटोले साकोली मतदारसंघातून, बाळासाहेब थोरात संगमनेर मतदारसंघातून, विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदारसंघातून तर कराडमधून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवणार आहेत.