मुंबई: सहा महिन्यांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे आता पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन होणार असताना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षातील कोणत्या मंत्र्यांचा राजीनामा घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
advertisement
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड अटकेत गेले. त्याच्या साथीदारांवर ‘मोका’ (MCOCA) लागू करण्यात आला. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला होता. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. मुंडे यांच्यासोबतच तानाजी सावंत यांना देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. एका वृत्तपत्राने याबाबतचा दावा केला आहे.
तानाजी सावंतांचे कमबॅक?
शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनादेखील कॅबिनेटमध्ये संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याची जबाबदारी सावंत यांच्यावर होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत भूम-परांडा मतदारसंघातून ते विजयी झाले. मात्र, त्यानंतर या सरकारमध्ये स्थान मिळाले नव्हते. त्यावरून ते नाराज असल्याची चर्चा होती. आता मात्र, त्यांना स्थान देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी एकाला मंत्र्याला वगळावे लागणार आहे.
कोणाला मिळणार डच्चू?
तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात घ्यायचे झाल्यास एकनाथ शिंदे यांना आपल्या एका मंत्र्याला नारळ द्यावा लागणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच एका बैठकीत काही मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यानंतर आता तानाजी सावंत यांना कॅबिनेटमध्ये स्थान दिल्यास एका मंत्र्याला आपलं मंत्रिपद सोडावं लागणार आहे.
शिंदे गटातून संजय शिरसाट आणि भरत गोगावले या दोघांपैकी एकाला मंत्रिपद सोडावं लागणार असल्याचे म्हटले जात आहे. संजय शिरसाट यांच्यावर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत धुरळा उडवून दिला होता. तर, भरत गोगावले यांनाही विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला होता. तर, दुसरीकडे त्यांच्या खात्याच्या कामगिरीवरून नाराजी असल्याची चर्चा आहे. भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत.