Maharashtra Cabinet Dhananjay Munde : धनुभाऊंना लाल दिवा मिळणार, शिंदेंच्या खास शिलेदारांचेही मंत्रिमंडळात कमबॅक? राजकीय घडामोडींना वेग
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Cabinet Expansion Dhananjay Munde : मी राजकीय बेरोजगार, हाताला काम द्या असे आर्जव काही दिवसांपूर्वी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना ‘रोजगार’ मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई : मी राजकीय बेरोजगार, हाताला काम द्या असे आर्जव काही दिवसांपूर्वी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना ‘रोजगार’ मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे आता पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पुढील आठवड्यातच त्यांना मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्याशिवाय एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे तानाजी सावंत यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.
advertisement
एका वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड अटकेत गेले. त्याच्या साथीदारांवर ‘मोका’ (MCOCA) लागू करण्यात आला. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मुंडे यांचे मंत्रिमंडळात कमबॅक होईल, अशी शक्यता कोणीही गृहित धरली नव्हती.
advertisement
चक्रे फिरली, धनुभाऊंना लाल दिवा मिळणार!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी २०२६ अखेर घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलली आहेत. या निवडणुकांमधूनच २०२९ च्या विधानसभा निवडणुकांची पायाभरणी होणार असल्याने, धनंजय मुंडे यांच्यासारख्या प्रभावी चेहऱ्याला मंत्रिमंडळाबाहेर ठेवणे राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारे नाही, असा निष्कर्ष पक्षनेतृत्वाने काढल्याचे सांगितले जाते.
advertisement
धनंजय मुंडे इन, मंत्रिमंडळातून कोण होणार आउट?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामध्ये पुढाकार घेत, मुंडे यांना मंत्रिमंडळात परत आणण्याचा निर्णय पक्का केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे आगामी आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार किंवा बदलाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी नरहरी झिरवळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
advertisement
तानाजी सावंतांचेही कमबॅक?
शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनादेखील कॅबिनेटमध्ये संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याची जबाबदारी सावंत यांच्यावर होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत भूम-परांडा मतदारसंघातून ते विजयी झाले. मात्र, त्यानंतर या सरकारमध्ये स्थान मिळाले नव्हते. त्यावरून ते नाराज असल्याची चर्चा होती. आता मात्र, त्यांना स्थान देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी एकाला मंत्र्याला वगळावे लागणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार, याची चर्चा रंगली आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2025 10:32 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Cabinet Dhananjay Munde : धनुभाऊंना लाल दिवा मिळणार, शिंदेंच्या खास शिलेदारांचेही मंत्रिमंडळात कमबॅक? राजकीय घडामोडींना वेग