कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कोविड-19 चा संसर्ग डोके वर काढत असल्याचे संकेत मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वीच 47 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आज डोंबिवलीतील 57 वर्षीय एका पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
सदर रुग्णावर गेल्या 6 दिवसांपासून ठाण्यातील कळवा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. आधीच त्यांना प्रकृती अस्वास्थाच्या कारणाने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील तपासणीनंतर कोविड संसर्ग झाल्याचे निदान झाले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, महापालिकेकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, याच भागात आणखी दोन कोविड रुग्णांवर सध्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
advertisement
47 वर्षीय महिलेचा मृत्यू...
दोन दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एका 47 वर्षीय महिलेचा कोविड आणि टायफॉइडच्या दुहेरी संसर्गामुळे मृत्यू झाला. या महिलेवर गेल्या 10 दिवसांपासून टायफॉइडसाठी ओपीडीमध्ये उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी सकाळी तिची प्रकृती अचानक खालावली. तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर संध्याकाळी तिचा मृत्यू झाला. तोपर्यंत तिच्या कोविड चाचणीचा रिपोर्ट समोर आला नव्हता.
मुंब्रातील 21 वर्षीय मुलाचा कोविडने मृत्यू...
मागील आठवड्यात ठाण्यातील एका तरुणाचा मृत्यू झाला होता. मुंब्रा येथे राहणारा वसीम सय्यद (वय 21) हा तरुण मधुमेह आजाराने त्रस्त होता. त्याच्या रक्तातील साखर नियंत्रित होत नसल्यानं त्याला त्याच्या शरीरात अनेक प्रकारचे इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे त्याची चाचणी करण्यात आली असता कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. वसीम सय्यदला गुरुवारी कळवा रुग्णालयात कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची प्रकृती अखेरीस शनिवार 24 मे रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला.