आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी कोरोनाच्या साथीबाबत महत्त्वाची माहिती देत राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
रोगप्रतिकारशक्ती वाढलेली, परिस्थिती नियंत्रणात
"सध्या आपली सामूहिक रोगप्रतिकारशक्ती वाढलेली आहे. त्यामुळे आधीसारखा गंभीर धोका आता नाही. नागरिकांनी अनावश्यक भीती न बाळगता जागरूक राहावं," असं आबिटकर यांनी सांगितलं.
advertisement
चाचण्या, मॅपिंग सुरू, सरकार सज्ज
राज्यात साथरोग नियंत्रणासाठी चाचण्या आणि संसर्ग मॅपिंग यांचं काम सुरू आहे. शासन सर्व आजारांवर त्वरित उपचार करण्यास आणि व्यवस्थापनासाठी सक्षम असल्याचं ते म्हणाले.
केईएम रुग्णालयातील मृत्यू कोरोनामुळे नाहीत
मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. यावर स्पष्टीकरण देताना, "ही दोन्ही प्रकरणं कोमॉर्बिड पेशंट्सची होती – त्यांचा मृत्यू कोरोना मुळे झाला नाही," असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
हॉंगकॉंग प्रवाशांबाबत केंद्राच्या निर्देशांची प्रतीक्षा
हॉंगकॉंगमध्ये वाढलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी काही SOP येण्याची शक्यता आहे. "सध्या केंद्राकडून कोणतीही नवीन सूचना आलेली नाही. मात्र, आल्या तर त्याचे तंतोतंत पालन करण्यात येईल," असं आबिटकर यांनी सांगितलं.
कोरोना आपल्या अवतीभवती आहे, पण...
"आजही आपल्याभोवती कोरोना रुग्ण असू शकतात. मात्र, त्यांचा संसर्ग गंभीर ठरण्याची शक्यता कमी आहे. फक्त कोमॉर्बिड रुग्णांनी (विविध आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी) विशेष काळजी घ्यावी," असा सल्लाही त्यांनी दिला.