पालकांमध्ये तीव्र नाराजी
शिक्षण विभागाच्या मते पेपर दरवाढ आणि इतर खर्च वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, शिक्षण वर्तुळातून या वाढीव शुल्कावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पालक शरद गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, दरवर्षी परीक्षा शुल्क वाढवले जाते, पण विद्यार्थ्यांना सुविधा काही मिळत नाहीत. महागाईच्या काळात ही वाढ म्हणजे पालकांवर अन्यायच आहे.
advertisement
परीक्षा अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणती?
दरम्यान परीक्षेच्या अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी 1 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन नावनोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी आयटीआय संस्थांमार्फत ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे.
या तारखेपर्यंत केली मुदतवाढ
परीक्षा मंडळाने उशिरा अर्ज भरणाऱ्यांसाठी 21 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परीक्षा शुल्काची रक्कम 7 नोव्हेंबरपर्यंत जमा करायची असून शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती तपासून 10 नोव्हेंबरपर्यंत मंडळाकडे सादर करणे आवश्यक आहे.
शिक्षक संघटनांनी प्रश्न उपस्थित केला आहे की विद्यार्थ्यांकडून अधिक शुल्क आकारले जात आहे, पण त्यांना परीक्षेच्या सुविधा, उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल जाहीर करण्यात काहीच सुधारणा दिसत नाही. शिक्षण क्षेत्रात वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्य विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक कोंडी आणखी वाढली आहे.
परीक्षा शुल्कात वाढ झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी निर्माण होणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर याचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. शिक्षणाचा खर्च दरवर्षी वाढत चालला आहे, त्यामुळे मोफत शिक्षण ही घोषणा आता फक्त कागदावरच राहिली असल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे.