मुंबईतील मानखुर्द-शिवाजी नगर या मतदारसंघातून नवाब मलिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ठिकाणी समाजवादी पक्षाचे अबू आझमी हे विद्यमान आमदार आहेत. मात्र, मानखुर्द शिवाजी नगर येथे भाजप हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवाब मलिकांचे काम करणार नाही. त्याऐवजी भाजपकडून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यात येणार आहे.
अजित पवारांनी घेतली मलिकांची बाजू...
advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार हे नवाब मलिक यांच्या पाठिशी आहेत. महायुतीत उमेदवार असतानाही अजित पवारांनी मलिकांना पक्षाचा एबी फॉर्म देत अधिकृत उमेदवारी दिली. अजित पवार हे मलिकांच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. अजित पवारांनी म्हटले की, नवाब मलिक आमचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे मी त्यांच्या रॅलीमध्ये जाणार आहे. नवाब मलिकांवर अजून आरोप सिद्ध झाले नाहीत. त्यांना दोषी कसे ठरवता असा उलट प्रश्नही त्यांना केला. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री काय करावे हा त्यांचा अधिकार असल्याचेही अजित पवारांनी म्हटले.
मलिकांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध का?
मलिक हे अणुशक्तीनगरमधील विद्यमान आमदार आहेत. मलिक यांच्याऐवजी त्यांची कन्या सना मलिक ही निवडणुकीच्या मैदानात असणार आहे. नवाब मलिक यांना उमेदवारी न देण्यावरून भाजपने ठाम भूमिका घेतली होती. मलिक हे मविआ सरकारच्या काळात मंत्री असताना विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप आणि दिलेल्या पुराव्यांमुळे नवाब मलिक हे तुरूगांत होते. मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असून त्यांच्याशी व्यवहार केले असल्याचा आरोप आहे. त्याआधी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदा घेत तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचा धुरळा उडवला होता. मलिकांवर असलेल्या गंभीर आरोपांमुळे भाजपने त्यांचा प्रचार न करण्याची भूमिका घेतली.