हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात सरकारकडून मिळालेल्या अतिवृष्टीच्या मदतीवरून शेतकऱ्यांचा रोष उसळला आहे. सरकारने दिलेल्या तुटपुंज्या मदतीचा निषेध करत गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी नोटा उधळून अनोखं आंदोलन केलं. “तुटपुंजी मदत नको, तुमची मदत परत घ्या!” अशी घोषणा देत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं. त्यांच्या हातात 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटा होत्या. या नोटा हवेत उधळत त्यांनी सरकारकडून दिलेल्या मदतीची थट्टा असल्याचा आरोप केला. अतिवृष्टीमुळे हिंगोली आणि सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असतानाही सरकारने या भागाला अतिवृष्टी बाधित यादीतून वगळल्याने शेतकरी अधिकच संतप्त झाले आहेत.
advertisement
सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असून तुटपुंजी मदत नव्हे तर आम्हाला योग्य नुकसानभरपाई हवी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. जर सरकारने हिंगोली आणि सेनगाव तालुक्याला अतिवृष्टी बाधित यादीत तातडीने समाविष्ट करून नुकसानभरपाई वाढवली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.