महाराष्ट्र सरकारने शहराचं नामांतर करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला केंद्रीय गृहमंत्रालयाने मान्यता दिली, त्यानंतर शहराच्या नामांतरावर शिक्कामोर्तब झालं. सांगलीमधल्या इस्लामपूर शहराचं नामांतर इश्वरपूर करण्याची राज्य शासनाची मागणी मान्य झाली आहे. त्यानंतर आता इस्लामपूर नगरपरिषदेचं नाव बदलून उरूण इश्वरपूर करण्यात यावे, असा आदेश महाराष्ट्र शासनाने जीआर काढून दिला आहे.
advertisement
बाळासाहेबांची मागणी पूर्ण
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी इस्लामपूरचे नाव इश्वरपूर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याचं सांगितलं होतं. केंद्र सरकारच्या गृह विभागाने हा प्रस्ताव सर्व्हे ऑफ इंडिया विभागाकडे पाठवला, त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर गृहमंत्रालयाने नामांतरावर शिक्कामोर्तब केलं आणि त्याबाबतचं पत्र राज्य सरकारला पाठवलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंत सबनीस यांनी 1970 साली सगळ्यात आधी नामांतराची मागणी केली होती. तर 1986 साली बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूरच्या यल्लमा चौकातल्या जाहीर सभेत हे इस्लामपूर नाही इश्वरपूर आहे, अशी जाहीर घोषणा दिली होती.
महाराष्ट्रात शहरांची नामांतरं
याआधी महाराष्ट्रमध्ये औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव तर अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या रेल्वे स्टेशनचं नावही बदलून अहिल्यानगर करण्यात आलं आहे.
