'मुंबई: मागील अनेक वर्षांपासून शासकीय नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून मेगा भरती करण्यात येणार आहे. जवळपास 10 हजार जणांना शासकीय नोकरी मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांबाबत राज्य सरकारने अखेर निर्णायक पाऊल उचलले आहे. राज्यभरातील 9,658 रिक्त पदे येत्या 15 सप्टेंबर 2025 पर्यंत भरली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनुकंपा तत्त्वावरील भरती होत असल्याने प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
या भरती प्रक्रियेत प्रथमच चतुर्थ श्रेणीतील पदांचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत ही पदे कंत्राटदारांच्या मार्फत भरली जात होती. मात्र यावेळी मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना थेट या नोकऱ्या मिळणार आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य व सुरक्षितता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भरती प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली होणार असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त्या पार पाडल्या जातील. अर्जापासून नियुक्तीपर्यंत उमेदवारांना अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी सरकारने प्रक्रियेत सुधारणा करण्याचाही निर्णय घेतला आहे.
अनुकंपा धोरण काय आहे?
1973 पासून लागू असलेल्या या धोरणांतर्गत सेवेत असताना मृत झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र वारसाला संबंधित विभागात नोकरी देण्याची तरतूद आहे. हे धोरण प्रामुख्याने गट क (क्लरिकल) आणि गट ड (चतुर्थ श्रेणी) पदांसाठी लागू आहे. यामुळे कुटुंबाला आर्थिक मदत मिळून उपजीविकेची जबाबदारी पार पाडता येते.
सरकारच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या हजारो कुटुंबांची अपेक्षा पूर्ण झाली आहे. उमेदवारांमध्ये समाधानाची भावना असून, भरती प्रक्रिया पारदर्शक व वेगवान होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.