Maharashtra local body election: राज्यातील 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आलं. तर 20 नोव्हेंबर रोजी देखील उर्वरित जागांसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीत 264 नगराध्यक्षपदाच्या जागांसाठी चार हजाराहून अधिक, तर नगरसेवकपदासाठी 50 हजारांच्या आसपास उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.
नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी पार पडलेल्या अटीतटीच्या मतदानानंतर, आज सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. आज, २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. गावपातळीवरील सत्तेची समीकरणं कोण जुळवणार आणि मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपलं दान टाकलंय, याचा फैसला अवघ्या काही तासांत होईल. आजचा हा रविवार अनेक राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली असून आज निकाल लागणार आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आज सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक मोजणी केंद्रावर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडेल. कोणताही गोंधळ किंवा अनुचित प्रकार टाळण्यासाठी केंद्रांच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.