नेमकं काय घडलं?
आरिफ लतिफ शेख (वय ४१, रा. कळमेश्वर) असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. आरिफने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री त्याला आशिष ग्वालबंशीचा फोन आला. त्याने हरीश ग्वालबंशी यांना भेटायला ये, असं फोनवरून सांगितलं. मात्र, आरिफने भेटायला जायला नकार दिला आणि तो जेवण करण्यासाठी दुसरीकडे गेला.
रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास आरिफ हा विसावा बारसमोर फोनवर बोलत उभा होता. याचवेळी बारमधून काही आरोपी बाहेर आले. त्यांनी आरिफला शिवीगाळ करत लाठी आणि दगडांनी बेदम मारहाण सुरू केली. मारहाण केल्यानंतर आरोपींनी त्याला बळजबरीने त्यांच्या कारमध्ये बसवले आणि कार नागपूरच्या दिशेने पळवली. कारमध्येही आरिफला मारहाण करण्यात आली. अखेरीस, फ्रेंड्स कॉलनी परिसरात पोहोचल्यावर त्याला पुन्हा मारहाण करून रस्त्यावर सोडून देण्यात आले.
advertisement
मारहाणीमागे राजकीय कारण?
आरिफने या प्रकाराची माहिती त्याच्या मित्रांना दिली आणि त्याला तातडीने मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आरिफच्या दाव्यानुसार, हरीश ग्वालबंशी यांनी त्याला "तू काँग्रेससाठी काम का करत नाहीस आणि भाजपला का पाठिंबा देत आहेस?" असा सवाल विचारून ही मारहाण केली.
गुन्हा दाखल, तिघांना अटक
आरिफच्या तक्रारीवरून पोलिसांनी माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी, राजेश उर्फ राजू सोनारे, अनिकेत अनिल उईके (२८), रोशन बबन यादव (३२) आणि आशीष ग्वालबंशी (२५) (सर्व रा. मकरधोकडा) यांच्या विरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पोलिसांनी अनिकेत, रोशन आणि आशीष या तिघांना तत्काळ ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे कळमेश्वरमधील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
