राज्याचे कौशल्य विकास मंत्री आणि मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या मतदारसंघातील जैन समुदायासाठी एक विशेष पत्र प्रसिद्ध केले आहे. मात्र, केवळ एका विशिष्ट समुदायाला मदतीचे आवाहन केल्यामुळे आता मुंबईच्या राजकीय वर्तुळात भाषिक आणि जातीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पत्रातील मजकूर काय?
२८ मार्च ते ४ एप्रिल या दरम्यान, जैन धर्मीयांचा 'आंबील की ओली' हा सण येत आहे. या सणादरम्यान भाविकांना अन्नासाठी आणि धार्मिक विधींसाठी गॅसची कमतरता भासू नये, या उद्देशाने लोढा यांनी जैन संस्था आणि सोसायट्यांना हे पत्र लिहिले आहे. "जैन समुदायाला गॅसची आवश्यकता असल्यास त्यांनी थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा," असे आवाहन या पत्राद्वारे करण्यात आले आहे.
advertisement
वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे
मुंबईत सध्या मराठी विरुद्ध अमराठी या मुद्द्यांवरून राजकारण तापलेले असताना, मंत्र्यांनी केवळ एका ठराविक समुदायासाठी मदतीचा हात पुढे केल्याने इतर समाजघटकांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे. "मंत्री हे संपूर्ण राज्याचे असतात की केवळ एका समाजाचे?" असा सवाल उपस्थित केला जात आहे. लहान-मोठे हॉटेल्स एलपीजी अभावी बंद पडत असताना मंत्री लोढा हे एका विशिष्ट समाजघटकाला एलपीजी कुठून उपलब्ध करून देणार, त्यांना सिलिंडर उपलब्ध करून देत असतील तर सामान्य लोक, लहान-मोठी हॉटेल्स, चहाची टपरी चालवणाऱ्यांसाठी एलपीजी उपलब्ध का नाहीत, असा सूरही उमटत आहे.
