मुंबई महापालिकेकडून आजही आंदोलकांसाठी सुविधा...
आझाद मैदानावरील आंदोलनासाठी आलेल्या आंदोलकांना, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुरवण्यात येत असलेल्या सेवा सुविधांची माहिती –
(दिनांक 31 ऑगस्ट 2025)
१) पाणी टँकर्स –
आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने एकूण २५ टँकर उपलब्ध करून दिले आहेत.
आझाद मैदान, महापालिका मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, हुतात्मा स्मारक चौक, बॉम्बे जिमखाना, हज हाऊस, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन, एअर इंडिया इमारत, त्याचप्रमाणे येलो गेट, फ्री वे वर शिवडी, कॉटन ग्रीन वाहन तळ, वाशी जकात नका या ठिकाणी सदर टँकर पाणीपुरवठा करीत आहेत.
२) स्वच्छता –
आझाद मैदान आणि संपूर्ण परिसरात मिळून महानगरपालिकेने सुमारे ८०० स्वच्छता कर्मचारी नेमले आहेत. या कर्मचाऱ्यांकडून अखंडपणे स्वच्छता राखली जात आहे.
आंदोलकांना देखील महानगरपालिकेच्या वतीने कचरा संकलनासाठी थैल्या (डस्टबिन बॅग) मोठ्या संख्येने वितरित करण्यात येत आहेत. या थैल्यांमध्ये आंदोलकांनी कचरा टाकून तो महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सोपवावा, यासाठी सातत्याने आवाहन करण्यात येत आहे.
३) प्रसाधनगृह –
आझाद मैदान आणि परिसरात, नियमित आणि फिरते असे मिळून सुमारे ३०० पेक्षा अधिक शौचकूप असणारी प्रसाधनगृहांची व्यवस्था आंदोलकांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. प्रसाधनगृहांमध्ये देखील नियमितपणे स्वच्छता केली जात आहे.