जरांगे पाटलांनी घोषणा करताच आझाद मैदानात मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय... एक मराठा, लाख मराठा अशा घोषणांनी इथला परिसर दणाणून गेला.
गुलाल उधळत मुंबई सोडणार असल्याची घोषणा जरांगे पाटलांनी केली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह
advertisement
मंत्री शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे, उदय सामंतसह अनेक नेते उपस्थित होते. सरकारकडून हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीला मान्यता देण्यात आली. सातारा गॅजेट लागू करण्याबाबतची अंमलबजावणी लवकरात लवकर केली जाणार असल्याचं जरांगेनी सांगितलंय. सप्टेंबर अखेरपर्यंत मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचं सरकारने मान्य केल्याची माहितीतही जरांगे पाटलांनी दिली. याचसोबत मराठा आंदोलनात बळी गेलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील वारसांना सरकारी नोकरीही देण्याचं आश्वासन सरकारने दिलंय.
जरांगेची सर्वात मोठी मागणी होती की मराठा आणि कुणबी एकच आहेत हे जाहीर केलं जावं. परंतु शासनाने यात अनेक कायदेशीर त्रुटी असल्याचे सांगत यावर दोन महिन्यांचा वेळ मागून घेतला आहे.
तसेच जरांगे पाटील यांच्या सगेसोयऱ्याच्या मागणीवरही सरकारने उत्तर दिले आहे. सगेसोयरेच्या अध्यादेशावर राज्यभरातून 8 लाख हरकती आल्या आहेत. आक्षेप तपासून, कायदेशीर त्रुटी दूर करून त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे सरकारने सांगितल्यानंतर त्यांना आपण एक महिन्याचा वेळ देत आहोत, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
अध्यादेशामध्ये जर फसवणूक झाली तर मंत्र्यांना फिरु देणार नाही असा इशाराही जरांगे पाटलांनी दिलाय. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन यशस्वी झाल्याची घोषणा केल्यानंतर मराठा आंदोलकांनी जोरदार जल्लोष साजरा केला.