मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मु्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना आगामी काळात आंदोलन उभारण्याचे संकेत दिले. मनोज जरांगे यांनी म्हटले की, मराठा बांधवांना विनंती आहे, आरक्षण 100 टक्के मिळणार आहे. जिव्हारी लागेल असे काम करू नका. बीड, जालना, सिल्लोड येथे आत्महत्या करण्यात आले. आत्महत्या करू नका असे आवाहन त्यांनी केले.
advertisement
मराठ्यांची लेकरं तुमची समजा, मुख्यमंत्र्यांना आवाहन...
मनोज जरांगे यांनी म्हटले की. मराठा आरक्षणासाठी तुम्हाला नेमके किती बळी हवे आहेत. मराठ्यांची लेकरं देखील तुमचं लेकरं आहे असे समजा असे आवाहन करताना तुम्हाला किती बळी घ्यायचे आहेत असा सवाल केला. मुख्यमंत्री तुम्ही आरक्षण देत नाही, ही कोणती मग्रुरी आहे. आम्हाला वेगळं आंदोलन करून तुम्हाला जेरीस आणावे लागेल. मुख्यमंत्र्यांनी तातडीने आरक्षण द्यावे अन्यथा आमचा संयम सुटणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. तुम्ही आमची मज्जा पाहणार असाल तर तुम्हाला याची फळं भोगावी लागतील असेही जरांगे यांनी म्हटले.
मराठ्यांचे मुडदे पडू देऊ नका...
मनोज जरांगे यांनी म्हटले की, मुख्यमंत्री तुम्हाला माणुसकी नाही का? मराठ्यांचे मुडदे पडू देऊ नका, पोरं धडाधड आत्महत्या करत आहेत. तुम्हाला मराठा समाजाची दयामाया येत नाही. तुमच्यामुळे आमच्या आत्महत्या होत असल्याचेही जरांगे यांनी म्हटले.
