लातूर: अन्न-पाण्याची, पावसाची तमा न बाळगता लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दोन दिवसांपासून अत्यंत हालाखीच्या वातावरणामध्ये दिवस काढत आहे. अशातच लातूरमधून आलेल्या एका मराठा तरुणाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची मनाला चटका लावून जाणारी बातमी समोर आली. विजय घोगरे असं या तरुणाचं नाव आहे. विजय हा त्याच्या कुटुंबीयांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि आई-वडील असा परिवार आहे. सरकाराला आणखी किती बळी पाहिजे, असा मन सुन्न करणारा सवाल त्याच्या भावाने विचारला आहे.
advertisement
मराठा आरक्षणासाठी मुंबई इथं मनोज जरांगे आमरण उपोषण करत आहेत. मुंबईमध्ये मागील दोन दिवसांपासून लाखो मराठा बांधव पावसाचा आणि भुकेचा सामना करून राहत आहे. अशातच आंदोलनात सहभागी असलेल्या विजय घोगरे या मराठा कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. विजय घोगरे हे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील रहिवासी होता.
विजय घोगरे मराठा आंदोलनातला बिन्नीचा शिलेदार
मयताचा चुलत भाऊ गोविंद घोगरे यांनी प्रसार माधम्यांना माहिती दिली. मी राहणार टाकळगाव, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर इथं मी राहणार आहे. माझा सख्खा चुलत भाऊ घोगरे यांचा मुंबईत मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात त्याची पत्नी दोन मुलं आणि आई-वडील असं कुटुंब आहे. विजय हा त्याच्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये तो पहिल्यापासून सहभागी झाला होता. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट टाकायचा. जरांगे यांच्यासोबत तो राहत होता. तो जरांगे यांचा बिनीचा शिलेदार होता.
"सरकार मायबाप अजून तुम्ही किती वेळ घेणार, किती बळी घेणार आहात. मुंबईत अत्यंत गलिच्छ वातावरण आहे, शौचालय नाही. प्यायला पाणी नाही. खायला काही नाही. आता लोकांनी उघड्यावर बसायचं आहे का, त्या ठिकाणी आमच्या लोकांना जेवणासाठी व्यवस्था नाही. अत्यंत उद्नगीन होऊन माझ्या भावाचा मृत्यू झाला आहे. पण हा मृत्यू नसून तो सरकारने घेतलाा आहे. सरकारला माझी विनंती आहे की, लवकर यावर निर्णय घ्या आणि आम्हाला बाहेर काढा. जर तसं होत नसेल तर आम्हाला सांगा किती बळी द्यायचे आहे, तशी आम्ही तयारी करतो" असं म्हणत गोविंद घोगरे यांनी सरकारसमोर हात जोडले.