भाईंदर पश्चिममध्ये ‘मराठी’ माणसांना घर नाकारल्याच्या तक्रारींच्या वादाला नवे वळण मिळाले आहे. काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष सिद्धेश प्रकाश राणे, प्रवक्ता रवि खरात आणि महासचिव किरण परुळेकर यांनी Balaji & Bhutra बिल्डर्सच्या ‘SkyLine’ प्रोजेक्टवर स्टिंग ऑपरेशन करून धक्कादायक वास्तव उघड केल्याचा दावा युवक काँग्रेसने केला आहे. स्टिंगदरम्यान प्रोजेक्टमधील संबंधित प्रतिनिधींनी ‘मराठी’ व्यक्तींना घर न देण्याबाबत स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले असल्याचे युवक काँग्रेसने सांगितले.
advertisement
बिल्डर हा जैन असून फक्त जैन बांधवांसाठीच इमारती बांधणार का, असा सवाल युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. स्थानिक आमदार जैन, बिल्डर लॉबीदेखील जैनच आहे. त्यामुळे भाईंदरमध्ये मराठी माणसाला डावलण्याचा प्रकार सुरू असून त्याच्याच राज्यात मराठीची गळचेपी सुरू आहे, असा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. मागील १० वर्षाच्या काळात मराठी माणसांना घर नाकारणे, मराठी माणसाच्या आाहारवर बंधने घालणे असले प्रकार वाढीस लागले असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे.
भाजप आमदारांनी स्वतःच्या 'व्होट बँक' साठी भाईंदर पश्चिम राखीव ठेवलंय का? आणखी किती काळ 'मराठी' माणसाचा हक्क मारणार? असा सवालही उपस्थित करण्यात आला. दरम्यान, मीरा-भाईंदरमध्ये मराठीची आणि मराठी माणसाची गळचेपी होत असल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित होत असतो. काही महिन्यांपूर्वी मराठी भाषेच्या मुद्यावरून मराठीजनांनी आंदोलनही पुकारले होते.
