मागील तीन दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्याच्या परिणामी नद्यांना पूर आला आहे. धाराशिव, सोलापूर, बीडमध्ये पुराचा तडाखा बसला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात दाखल झाले. चिंचपूर ढगे या भूम तालुक्यातील गावात त्यांनी पाहणी सुरू केली. दरम्यान तिचे नुकसान सांगताना गिरीश महाजन यांच्या समोर शेतकऱ्यांना रडू कोसळले.
advertisement
पूरानं सगळंच हिरावलं, संतप्त शेतकऱ्यांनी गिरीश महाजनांचा ताफा अडवला
काही ठिकाणी पाहणी केल्यानंतर पुढील ठिकाणी जात असताना शेतकऱ्यांनी गिरीश महाजन यांचा ताफा रोखला. जनावरे दगावली असून आम्हाला तात्काळ मदत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले की, मी प्रशासनाला सांगून मदत करायला सांगतो. मी पैसे घेऊन आलो नाही असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले. भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे गावात शेतकऱ्यांचे शेकडो जनावरे वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून गिरीश महाजन यांनी पुढील गावातील पाहणी न करताच बार्शीच्या दिशेने निघाले.