अभिजित पोते, प्रतिनिधी, पुणे : कोथरूडमधील एक दांडिया कार्यक्रम भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी बंद पाडला. खासदार मेधा कुलकर्णी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आवाजाची मर्यादा आणि धार्मिकतेची बंधन ओलांडली आहे. त्यामुळे या पुढे या मैदानात असे कार्यक्रमात होऊ देणार नाही', असं म्हणत गरब्याचा कार्यक्रम बंद पाडला. आता या घटनेवर खासदार मेधा कुलकर्णी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
पुण्यात ठिकठिकाणी नवरात्री निमित्ताने गरबा आणि दांडियाचं आयोजन करण्यात आलं आहे. कोथरूडमध्ये देखील गरब्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. शुक्रवारी रात्री कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडल्याचं समोर आलं. खुद्द भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांची तक्रार पोलिसांकडे केली होती. पण, तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार घडला. त्यानंतर कार्यक्रमाच्या स्टेजवर जाऊन मेधा कुलकर्णी यांनी कार्यक्रम बंद पाडला.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी गरबा कार्यक्रमात स्वतः पोहोचून तो बंद पाडताना दिसून येत आहेत. या प्रकरणावर त्यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली असून, “हे पाऊल नागरिकांच्या तक्रारीवरून आणि नियमभंग रोखण्यासाठी उचललं,” असं स्पष्ट केलं आहे.
पोलिसांवर मेधा कुलकर्णींची नाराजी...
खासदार मेधा कुलकर्णी यांनी म्हटले की, या कार्यक्रमात आवाज मर्यादा ओलांडण्यात आली होती आणि DJ वाजवण्यात आला होता. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं आणि आजारी व्यक्तींना याचा त्रास होतो आहे. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या, पण पोलिसांनी काहीच पावलं उचलली नाहीत. त्यामुळे मला स्वतः तिथे जावं लागलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. “मी पोलीस अधिकाऱ्यांशी आधीच संपर्क केला होता, परंतु कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे त्यांनी म्हटले. आवाजाच्या नियमांचं उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अन्यथा हे प्रकार वाढतील,” असा इशाराही त्यांनी दिला.
पुण्यात जनआंदोलन उभारण्याचा इशारा
या पुढे डीजेच्या विरोधात आणि जी आवाजाची मर्यादा वारंवार ओलांडली जात आहे त्याच्या विरोधात पुण्यात मोठे जनआंदोलन उभे करू असा इशाराही त्यांनी दिला.