मुंबई: दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाजवळील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. हा प्रकार समोर आल्यानंतर तात्काळ शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी केली. तर, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी करणार आहेत. दरम्यान, त्याआधी मोठी समोर आली आहे.
advertisement
छत्रपती शिवाजी पार्क मैदानाच्या जवळ मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे. आज सकाळी 7.30 ते 8 वाजण्याच्या सुमारास पुतळ्याच्या विटंबना करण्याचा प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पुतळ्याच्या आजूबाजूला लाल रंग उडाला असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी पुतळा स्वच्छ करण्यास सुरुवात केली. या प्रकारानंतर शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार महेश सावंत यांनी सांगितले की, पोलिसांच्या माहितीनुसार सकाळी 6.10 वाजेपर्यंत सगळं व्यवस्थित असल्याची माहिती आहे. याचा अर्थ ही घटना सकाळ 6.10 वाजल्यानंतर झाली असावी अशी माहिती त्यांनी दिली.
आरोपी सीसीटीव्ही मध्ये दिसणार नाही?
छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे. मात्र, या ठिकाणी असलेल्या 5 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी एकाचाही ॲंगल मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर नाही. त्यामुळे शिवसैनिकांच्या माँसाहेब असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करणारे सीसीटीव्ही मध्ये रेकॅार्डच झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणेवरच प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानात अनेक राजकीय घडामोडी सातत्याने घडत असतात. असे असतानाही संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही बरोबर का नाही लावण्यात आले? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
मीनाताई ठाकरे कोण आहेत?
दिवंगत मीनाताई ठाकरे या शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी होत. शिवसैनिक त्यांना माँसाहेब असे संबोधत असे. मातोश्रीवर आलेल्या शिवसैनिकाची विचारपूस करणे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था मीनाताई करत असे. शिवसैनिक आणि त्यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध होते. मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ छत्रपती शिवाजी पार्क मैदानाजवळ पुतळा उभारण्यात आला. मीनाताई यांची जयंती आणि स्मृतीदिनी शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमतात.