कराड : मागील काही दिवसांपासून स्वस्तात मस्त लॅब रिपोर्ट तयार करून देण्याच्या जाहिरातींचा सुळसुळाट झाला आहे. अशातच सातारा जिल्ह्यातील कराडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कराडमध्ये बनावट स्वाक्षरीतून फेक लॅब रिपोर्ट तयार करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अखेरीस पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुणे, मुंंबई, कोल्हापूरसह कराडमधील 17 जणांचा तक्रारीत उल्लेख आहे.
advertisement
कराडमधील शंभूतीर्थ चौक परिसरातील मेट्रोपॉलिस लॅबोरटीमध्ये डॉक्टरांच्या अनुपस्थितीत पॅथोलॉजी चाचण्या करून बनावट स्वाक्षरीचा वापर करत रुग्णांना अहवाल देण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. कराडमधील पॅथोलॉजिस्ट डॉ. संदीप यादव यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीमध्ये या लॅबशी संबंधित 17 जणांच्या नावांचा समावेश केला असून कराड पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. संबंधित लॅबोरटरीमध्ये रुग्णांच्या रक्त-लघवी आदी नमुन्यांवर चाचण्या करून त्यांचे अहवाल तयार केले जातात. या अहवालांवर पॅथोलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक डॉ. स्मिता सडके यांच्या स्कॅन केलेल्या सही आणि शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख केला जातो.
मात्र त्या प्रत्यक्ष प्रयोगशाळेमध्ये हजर नसतानाच टेक्निशियन आणि इतर कर्मचारी स्वतःच अहवाल तयार करत असल्याचं निदर्शनास आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या अवैध प्रकारातून आर्थिक फायदा करून जनतेची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप डॉ. यादव यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीद्वारे केला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
