कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई (पालघर) येथे 5285 फ्लॅट, ओरोस (सिंधुदुर्ग) आणि कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरिता लॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीसाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला 12 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनामत रकमेसह आलेल्या पात्र अर्जांची सोडत 9 ऑक्टोबर 2025 रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात काढली जाणार आहे.
advertisement
म्हाडातर्फे पहिल्यांदा अर्जदारांना 28 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. 28 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत 1,49,948 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर अनामत रकमेसह आलेल्या अर्जांची संख्या 1,16,583 इतकी आहे.
लॉटरीचे नवीन वेळापत्रक
नवीन वेळापत्रकानुसार या लॉटरीसाठी 12 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. ऑनलाईन अनामत भरण्यासाठी 13 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत मुदत आहे. जे अर्जदार आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे बँकेत अनामत रक्कम भरणार आहेत त्यांच्यासाठी 15 सप्टेंबर 2025 रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
लॉटरीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी 22 सप्टेंबर, 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता 'म्हाडा'च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून 24 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन दावे व हरकती नोंदवता येणार आहेत. लॉटरीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी 7 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता 'म्हाडा'च्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. 9 ऑक्टोबर 2025 रोजी सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या व वेटिंगवर असलेल्या अर्जदारांची नावे म्हाडाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे.
सोडतीसंदर्भात अर्ज भरतांना अर्जदारांना येणार्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी मंडळातर्फे 022 - 69468100 हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. सोडतीसाठी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्जदारांनी अर्ज करावा, असं आवाहन कोकण मंडळातर्फे करण्यात आलं आहे.
