याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ताडदेव परिसरात म्हाडाची अनेक घरं विक्रीविना पडून आहेत. या घरांच्या विक्रीसाठी लॉटरी पद्धतीचा अवलंब केला होता. मात्र, तरी देखील या घरांकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचं पहायला मिळालं. विक्रीविना पडून असलेल्या घरांची थेट विक्री करण्याच्या विचारात म्हाडा आहे.
Lalbaugcha Raja: ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी रांगा, यंदाच्या गणेशोत्सवात खास थीम, PHOTOS
advertisement
राज्याच्या गृहनिर्माण धोरणातील तरतुदीनुसार, मोठमोठे गृह प्रकल्प उभे करताना बिल्डरकडून प्रीमियमच्या माध्यमातून म्हाडाला काही घरं मिळतात. अशाच प्रकारे म्हाडाला ताडदेव येथील मोठ्या टॉवरमध्ये आठ घरं मिळाली होती. या घरांची किंमत खूपच जास्त असल्याने त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. या घरांच्या मेंटेनन्ससाठी म्हाडाला मोठी रक्कम मोजावी लागत आहेत. त्यामुळे आता या घरांची लॉटरीशिवाय विक्री करण्याचा म्हाडा विचार करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर मुंबईतील या घरांची विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आणि यासाठी लवकरच जाहिरात काढण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या संदर्भात अद्याप म्हाडाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दक्षिण मुंबईतील ताडदेव हा देशातील सर्वात महागडा रहिवासी परिसर बनत चालला आहे. इथे घर घेण्याची इच्छा असेल तर तुम्हाला एका चौरस फुटासाठी तब्बल 55 हजार रुपयांपेक्षा जास्त रुपये मोजण्याची तयारी ठेवावी लागते, असं म्हटलं जातं. अशा परिसरात म्हाडा घरांची विक्री करणार असल्याने मुंबईत घर घेऊन इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
फसवणुकीस बळी पडू नका
"म्हाडाच्या घरांची विक्री फक्त कॉम्प्युटराईज्ड लॉटरीच्या माध्यमातूनच केली जाते. म्हाडाची लॉटरी प्रणाली हाताळण्यास अत्यंत सोपी, सुलभ आणि पूर्णत: ऑनलाईन आहे. घरांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेलं नाही. अर्जदाराने कोणत्याही व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये. तसे केल्यास म्हाडा कोणत्याही व्यवहारास किंवा फसवणुकीस जबाबदार राहणार नाही," असं म्हाडाकडून वारंवार सांगितलं जातं.