म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 5,285 फ्लॅट आणि 77 भूखंडांच्या विक्रीसाठी जुलै महिन्यात लॉटरी काढण्यात आली. 14 जुलैपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाल्याने म्हाडाने दोन वेळा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता इच्छुकांना 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
advertisement
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गेल्या दीड महिन्यांत 1 लाख 27 हजारांहून अधिक नागरिकांनी म्हाडाच्या घरासाठी अनामत रकमेसह ऑनलाइन अर्ज भरले आहेत. प्रत्येक अर्जामागे म्हाडाला 500 रुपये मिळत आहेत. म्हणजेच फक्त अर्जांच्या माध्यमातून म्हाडाला 6 कोटी 35 लाख रुपयांची कमाई झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 12 सप्टेंबर असल्याने ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गुरुवारी (4 सप्टेंबर) संध्याकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार, 1 लाख 60 हजार 721 लोकांनी घरासाठी अर्ज केला आहे. 1 लाख 27 हजार 191 जणांनी अर्जासह अनामत रक्कम देखील भरली आहे. ही अनामत रक्कम लॉटरी निघाल्यानंतर संबंधितांना परत केली जाणार असली तरी अर्जाचे 500 रुपये म्हाडाला मिळणार आहेत.
कोकण मंडळाच्या लॉटरीतील घरं अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील असून त्याची किंमत 12 ते 50 लाख रुपयांपर्यंत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांकडून लॉटरीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत.
सरकारचाही फायदा
म्हाडाच्या 500 रुपये शुल्कावर 18 टक्के जीएसटी लावला जात आहे. त्यामुळे प्रत्येक अर्जामागे सरकारला देखील 90 रुपये मिळत आहेत. त्यामुळे म्हाडाप्रमाणेच केंद्र आणि राज्य सरकारला जीएसटीपोटी संबंधित अर्जदारांकडून 1 कोटी 14 लाख रुपयांची कमाई झाली आहे.