Mhada Lottery 2025: नाशिकमध्ये घरं घेण्याची मोठी संधी, म्हाडाने 478 घरांची लॉटरी केली जाहीर, संपूर्ण माहिती
Last Updated:
नाशिक मंडळाच्या या सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गतच्या एकूण ४७८ सदनिकांचा समावेश असून या सर्व सदनिका अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी उपलब्ध आहेत.
नाशिक: नाशिकमध्ये जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर आता एक चांगली संधी चालून आली आहे. म्हाडा नाशिक मंडळातर्फे तब्बल ४७८ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. नाशिकमध्ये ही कमी किंमतीत घरं उभारण्यात आली आहे. या सोडतीसाठी अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.
नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) नाशिक शहर परिसरातील गंगापूर शिवार, देवळाली शिवार, पाथर्डी शिवार, म्हसरुळ शिवार, नाशिक शिवार व आगर टाकळी शिवार २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील विविध गृहप्रकल्पांतर्गत ४७८ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. शिवकुमार आवळकंठे, मुख्य अभियंता श्री. धीरजकुमार पंदिरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल वानखडे आदी उपस्थित होते.
advertisement
म्हाडाच्या सोडतीसाठी तयार करण्यात आलेल्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच व म्हाडा लॉटरी ॲपवरुन इच्छुक अर्जदारांनी अर्ज करावा. मंडळातर्फे सदनिकांच्या वितरणासाठी कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार आणि प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये, असं आवाहन म्हाडाकडून करण्यात आलं आहे.
किती आहे घराच्या किंमती?
नाशिक शहर परिसरातील गंगापूर शिवार, देवळाली शिवार, पाथर्डी शिवार, म्हसरुळ शिवार, नाशिक शिवार व आगर टाकळी शिवारामध्ये म्हाडाची घरं उपलब्ध आहे. घराची किंमत १८ लाख ५० हजारांपासून सुरू होते. सर्वात महागड्या घराची किंमतही २७ लाख इतकी आहे.
advertisement
सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता नियमावली, मार्गदर्शक सूचना माहिती पुस्तिकेत नमूद करण्यात आल्या आहेत. ही पुस्तिका म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छूक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोडतीसाठी दिनांक ०४ सप्टेंबर, २०२५ रोजी दुपारी ०१.०० वाजेपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून, दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५ रोजी रात्री ११. ५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांना दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे.

advertisement
दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक १७ ऑक्टोबर, २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर केली जाणार आहे. सोडतीचा दिनांक व स्थळ संकेतस्थळावर कळविले जाणार आहे.
नाशिक मंडळाच्या या सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गतच्या एकूण ४७८ सदनिकांचा समावेश असून या सर्व सदनिका अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी उपलब्ध आहेत. सोडतीअंतर्गत देवळाली शिवारात २२ सदनिका, गंगापूर शिवारात ५० सदनिका, पाथर्डी शिवार ६४ सदनिका, म्हसरुळ शिवार १९६ सदनिका, नाशिक शिवार १४ सदनिका, आगर टाकळी शिवार १३२ सदनिका तर नाशिक शिवारात १४ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
Location :
Nashik [Nasik],Nashik,Maharashtra
First Published :
September 04, 2025 7:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mhada Lottery 2025: नाशिकमध्ये घरं घेण्याची मोठी संधी, म्हाडाने 478 घरांची लॉटरी केली जाहीर, संपूर्ण माहिती